RSS नेत्याला कानाखाली मारल्या प्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला भर बाजारात मारहाण

उत्तर प्रदेशमधील बिजनौर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांची १५ जुलैला आरएसएसचे नेते उमंग काकारान यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. झालू शहरातील रहिवासी उमंग काकरान वडील रामेंद्रसिंग यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या निरीक्षक अरुण कुमार राणा यांनी अहवाल सादर करण्यास नकार दिला. याच कारणामुळे दोघांत वाद झाला.

  उत्तर प्रदेश मधील बिजनौर परिसरात जमावाने एका पोलिस अधिकाऱ्याला भर बाजारात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एक निलंबीत पोलीस निरीक्षक भाजी घेऊन घरी परतत होते. त्यावेळी दुचाकीवरून काही तरुण आले आणि त्यांनी या निलंबित पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान जेव्हा लोक जमा झाले त्यावेळी या तरुणांनी तिथून काढता पाय घेतला. या संपूर्ण घटनेची तक्रार पीडित पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकात नोंदवली आहे.

  काय आहे नेमकं प्रकरण?

  उत्तर प्रदेशमधील बिजनौर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांची १५  जुलैला आरएसएसचे नेते उमंग काकारान यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. झालू शहरातील रहिवासी उमंग काकरान वडील रामेंद्रसिंग यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या निरीक्षक अरुण कुमार राणा यांनी अहवाल सादर करण्यास नकार दिला. याच कारणामुळे दोघांत वाद झाला.

  याच बाचाबाची दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांनी उमंगला कानाखाली मारल्याचा आरोप केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस चौकीसमोर निदर्शनेही केली. या प्रकरणी पोलीस अधिक्षक धर्मवीर सिंग यांनी निरीक्षकास निलंबित केले होते. आता निलंबित पोलीस निरीक्षकाने १६ जुलै रोजी झालेल्या हल्ल्याचा संबंध १५ जुलै रोजी घडलेल्या प्रकरणाशी जोडला आहे.

  अरुण कुमार राणा झालू शहरपरिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. १६ जुलैला संध्याकाळी ते भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर गेले असता काही दुचाकीस्वारांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर लाठ्यांनी हल्ला केला. पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले.

  दरम्यान, अरुण कुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.