केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती,१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण लवकरच होणार सुरु

१८ वर्षांखालील मुलांचं लसीकरण लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने(Central Government) दिली आहे.

    देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Corona Vaccination Drive) मोहीम आता जोर धरू लागली आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण वेगात सुरू आहेच. मात्र आता १८ वर्षांखालील मुलांचं लसीकरणही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने(Central Government) दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या(Vaccine Tests) करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

    केंद्र सरकारने आज दिल्ली उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती दिली. १८ वर्षांखालील मुलांवर सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात करण्यात येईल, असं केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं.

    १२ ते १८ वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी अशी याचिका एका १२ वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका ८ वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. सरन्यायाधीश डी.एन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या विभागीय खंडपीठाने आज सांगितलं की, संपूर्ण देश लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला अजून थोडा वेळ दिला असून पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला होणार असल्याचे आदेश दिले आहेत.

    लसीच्या चाचणी प्रक्रियेला वेळेची मर्यादा घालून द्यावी या मागणीला न्यायालयाने धुडकावून लावलं आहे. संशोधनाला वेळेची मर्यादा घालून चालणार नाही, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं. प्रत्येकजण लस मिळवण्याच्या घाईत आहेत. मात्र, जर योग्य चाचण्या झाल्या नाहीत तर मोठं संकट निर्माण होईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.