आरोग्य सुविधा वाढवायच्या तेव्हा आम्ही टाळ्या वाजवत राहिलो; अर्थमंत्र्यांच्या पतीची मोदी सरकारवर टीका

    नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात साडे तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पत्नी आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं आहे. कोरोना संकटात वंचितांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त होतं, अशी टीका प्रभाकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या एका कार्यक्रमात केली.

    दरम्यान स्वत:ला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीकणाबद्दल सरकारला काही सल्ले दिले. त्यावर केंद्रातील एका मंत्र्यानं अतिशय वाईट प्रतिक्रिया दिली. त्यांना या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, अशी टीका प्रभाकर यांनी केली आहे. गेल्या वर्षीदेखील प्रभाकर चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी एका लेखाच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकेची झोड उठवली होती.

    तसेचं लॉकडाऊन हा कोरोना संकटावरचा उपाय नाही, लसीकरण हाच कोरोना संक्रमण रोखण्याचा उपाय आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी व्हायला हवा होता. पण त्यावेळी आपण दिवे पेटवत राहिलो, टाळ्या-थाळ्या वाजवत राहिलो, अशा शब्दांत प्रभाकर यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

    आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून वंचित वर्गाला मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्यात व्यस्त होतं. स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्यातून सरकारचा निष्ठुरपणा दिसून आला, अशा कडक शब्दांत प्रभाकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.