“भाजपात प्रवेश करून चूक केली, दीदी तुमच्या शिवाय नाही राहू शकत”: सोनाली गुहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपात दाखल झाले होते. ममतांच्या वर्तुळातील सुवेंदू अधिकारींपासून ते अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी कमळ हाती घेतलं. यात तृणमूल काँग्रेसमध्ये असताना चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांचाही समावेश होता.

  कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. सीबीआयच्या कारवाईने कोलकात्यातील राजकारण पेटलं होतं. त्याचे लोळ विझत नाही, तोच आता नवीन नाट्यमय घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या पत्राची सध्या बंगालमध्ये चर्चा होत आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. “भाजपात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय राहू शकत नाही,” असं म्हणत घरवापसी करून घेण्याची विनवणी केली आहे.

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपात दाखल झाले होते. ममतांच्या वर्तुळातील सुवेंदू अधिकारींपासून ते अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी कमळ हाती घेतलं. यात तृणमूल काँग्रेसमध्ये असताना चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीआधी भाजपात दाखल झालेल्या सोनाली गुहा यांना आता पुन्हा तृणमूलच्या वाटेवर आहेत. त्यांनी तसं पत्र लिहून आपल्याला पक्षात घेण्याची विनवणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

  सोनाली गुहा तृणमूल काँग्रेसच्या चार वेळा आमदार राहिलेल्या आहेत. ममता बॅनर्जींच्या वर्तुळातील म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने त्या नाराज होत्या. माध्यमांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाकडून त्यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र पक्ष मजबूत करण्याचं काम करू, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. “माझा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि त्याची जाणीव मला होत आहे. तिथे मला नेहमी वेगळं असल्याची जाणीव झाली. त्यांनी माझा वापर केला. मला ममतांची बदनामी करण्यास सांगितलं, पण मी असं केलं नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात गुहा काय म्हणाल्या?

  दुभंगलेल्या मनाने मी हे पत्र लिहित असून, भावनिक होऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. जर आपण मला माफ केलं नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेल. ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही,” असं म्हणत सोनाली गुहा यांनी आपल्याला पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याची विनवणी ममता बॅनर्जी यांना केली आहे.

  west bengal can not live without didi bjp leader sonali guha write a letter to mamata banergee