काय सांगता? कोरोना टेस्ट घरच्या घरी स्वतःलाच करता येणार ; RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चची मंजुरी

ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानलं जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही. असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानलं जाईल

  मुंबई : लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे. COVISELF (Pathocatch) असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट तयार करण्यात आली आहे. या किटमार्फत लोक आपल्या नाकातील स्वॅब सॅम्पल घेऊन आपली चाचणी करू शकतील.आयसीएमआरने कोरोना टेस्टबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लोक घरीसुद्धा अँटिजेन टेस्ट करू शकतात. ही होम टेस्टिंग फक्त अशा लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी आहे, जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत.

   

  अशी करू शकता स्वतःची कोरोना टेस्ट?

  होम टेस्टिंगसाठी COVISELF किट आणि मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

  COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचं आहे.

  त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.

  ज्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा.

  हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल.

  मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

  या टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानलं जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही. असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानलं जाईल आणि आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.