india and china

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा सातवा आणि अंतिम टप्पा आज पार पडणार आहे. पूर्व लडाखमधील चुशूल प्रांतात दोन्ही देशांचे प्रमुख सेनाधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. दुपारनंतर या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( Line of Actual Control) तैनात केलेले सैन्य मागे घ्यावे, ही भारताची प्रमुख मागणी आहे.

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचा सातवा आणि अंतिम टप्पा आज पार पडणार आहे. पूर्व लडाखमधील चुशूल प्रांतात दोन्ही देशांचे प्रमुख सेनाधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. दुपारनंतर या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( Line of Actual Control) तैनात केलेले सैन्य मागे घ्यावे, ही भारताची प्रमुख मागणी आहे.

लेहच्या १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा होणार आहे. या फेरीनंतर सिंह निवृत्त होणार असून त्यांच्याकडून १४ कॉर्प्सच्या कमांडरपदाचा पदभार स्विकारणारे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन हे देखील या चर्चेत सहभागी होतील. विशेष म्हणजे चीनकडून पहिल्यांदाच परराष्ट्र खात्यातील अधिकारी या चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेच्या यापूर्वीच्या म्हणजेच सहाव्या फेरीत भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. परराष्ट्र खात्याचे पूर्व आशिया सहसचिव नवीन श्रीवास्तव हे गेल्या फेरीपासून या चर्चेत सहभागी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीननेदेखील त्यांच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना चर्चेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यापूर्वी १० सप्टेंबरला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेत ५ मुद्द्यांवर दोन्ही देशांत सहमती झाली होती. मात्र या चर्चेत चीनने मान्य केलेल्या बाबींची अंमलबजावणी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) कडून होत नसल्याचे भारताच्या निदर्शनास आले. त्यामुळेच सैन्याधिकाऱ्यांच्या या चर्चेत परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय भारताने घेतला होता.
चीनने या वर्षीच्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी फौजफाटा वाढवायला सुरुवात केल्यापासून दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. या प्रकरणी शांततेने तोडगा काढण्याच्या हेतूने जून महिन्यापासून या चर्चांना सुरुवात झाली. चीनने सैन्य मागे घ्यावं ही मागणी पहिल्या फेरीपासून भारताने कायम ठेवली आहे. मात्र चीनकडून या मागणीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

संपूर्ण पूर्व लडाख परिसरात चीननं तैनात केलेल्या सैन्याच्या माघारीबाबत चर्चा व्हावी, यासाठी भारत आग्रही आहे. मात्र संपूर्ण लडाखबाबत चर्चा करायला चीन तयार नसल्याची माहिती आहे. केवळ पँगॉंग त्सो तलाव परिसरातील सैन्याच्या तैनातीबाबत चर्चा व्हावी, अशी चीनची भूमिका आहे. या चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे भारत आणि चीनसह संपूर्ण जगाचे लक्ष आहे.