२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा Modi Wave चालणार का ? उ. प्रदेश, पंजाबमध्ये काय असेल मतदारांचा कल ?

या निवडणुकांमध्ये भाजपाला (BJP) किती यश मिळणार, यावर आगामी लोकसभा निवडणुकांची (Loksabha Elections) गणिते ठरणार आहेत. त्यातही उ. प्रदेशमध्ये (Utter Pradesh) सत्ताधारी असलेल्या भाजपाचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या स्थितीत निवडणुका पार पडल्यास काय होईल, याचा सर्वे एबीपी न्यूज आणि सी व्होटर (ABP News and Sea Voter Survey) या संस्थेने केला.

  नवी दिल्ली : प. बंगाल विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर, आता २०२२ साली होणाऱ्या पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला किती यश मिळेल, याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. २०२२ साली उ. प्रदेश, पंजाब या मोठ्या राज्यांसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणमुका होणार आहेत. कोरोना कालखंड, वाढती बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर मतदार आपला कल मतपेट्यांमध्ये टाकणार आहेत.

  या निवडणुकांमध्ये भाजपाला किती यश मिळणार, यावर आगामी लोकसभा निवडणुकांची गणिते ठरणार आहेत. त्यातही उ. प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या स्थितीत निवडणुका पार पडल्यास काय होईल, याचा सर्वे एबीपी न्यूज आणि सी व्होटर या संस्थेने केला. त्यात पाच राज्यांपैकी ४ राज्यांत भाजपाला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उ. प्रदेशात जागा घटल्या तरीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाला यश मिळवून देतील, अशी शक्यता आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेससमोर आपचे आव्हान असणार आहे. काय असेल या पाचही राज्यातील विधानसभा निकालांची स्थिती सविस्तर पाहूयात.

  उ. प्रदेश – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीबाबत समाधानी आहात का, या प्रश्नावर ४५ टक्के उ. प्रदेशवासियांनी सहमती दर्शवली आहे. ३४ टक्के जनता ही योगी सरकारवर नाखूश आहे. तर विरोधी पक्ष सक्षमपणे काम करीत आहेत का, या प्रश्नावर ४० टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे. उ. प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात पुन्हा विधानसभा निवडणुकांना भाजपा सामोरा जाणार आहे. यात राममंदिराचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. उ. प्रदेशात जागा घटल्या तरीही भाजपाच नंबर १ चा पक्ष राहिल, अशी शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला २५९ ते २६७ जागा, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला १०९ ते ११७ जागा, काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाची मोठी व्होट बँक समाजवादी पार्टीकडे वळण्याची शक्यता आहे.

  उत्तराखंड – राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या कामगिरीवर ३६ टक्के जनतेनी समाधान व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४४ ते ४८, काँग्रेसला १९ ते २३ , तर आम आदमी पार्टीला ० ते ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्ष आणि अपक्ष हे ० ते २ जागांपर्यंतच राहतील, अशी शक्यता आहे.

  पंजाब- मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस सरकारपुढे आव्हाने असणार आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा आपचा पर्याय पंजाबच्या नागरिकांना अधिक भावण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३८ ते ४६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर आपला ५१ ते ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील २२ टक्के जनता ही अरविंद केजरीवाल यांना पसंती देते आहे. तर सीएम पदासाठी अमरिंदर सिंग १८ टक्के, सुखबीरसिंग बादल यांना १९ टक्के, भगवंत मान यांना १६ टक्के तर नवज्योतसिंग सिद्दधू यंना १० टक्के जनतेची पसंती आहे.

  गोवा – गोव्यात पुन्हा भाजपा सत्ता राखेल अशी शक्यता आहे. भाजपाला २२ ते २६ जागा, काँग्रेसला ३ ते ७ जागा, तर आपला ४ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि अपक्ष यांना ३ ते ७ जागा मिळतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.