‘या’ राज्यातील महिलांना दरवर्षी मिळणार १८,७५० रुपये

हैदराबाद. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे जनकल्याणकारी योजना राबविण्यासाठी ओळखले जातात. गरिबांना आणि वंचितांना सरकारकडून जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी ते नवनवीन योजना अमलात आणणात. महिला सशक्तिकरणासाठी मुख्यमंत्री जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशात ‘वायएसआर चेयुता’ योजनेचा शुभारंभ केला. महिला सशक्तिकरणासाठी ही महत्त्वपूर्ण योजना मानली जाते. बुधवारी आपल्या कार्यालयातूनच या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

अल्पसंख्यांक महिलांना लाभ
वय वर्षे ४५ ते ६० या वयातील महिलांसाठी ‘वायएसआर चेयुता’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 18,750 रुपये मिळणार आहेत तर चार वर्षाला ७५ हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. एसी, एसटी, बीसी आणि अल्पसंख्यांक समाजातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. चेयुता हा तेलुगू भाषेतील शब्द असून त्याचा मराठी अर्थ सेवा असा होतो.

अनेक योजना
आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ‘जगनन्ना सति दीवेना योजना’ सुरू केली. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात तब्बल २३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात केली आहे तरतूद
बुधवारी सीएम जगनमोहन यांनी बटन दाबून या योजनेचा शुभारंभ केला, त्यावेळी पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात १८,७५० रुपये जमा करण्यात आले. या योजनेसाठी आंध्र प्रदेश सरकारने ४,७०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. राज्यातील २५ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठीही आंध्र सरकारने मोठ्या कंपन्यांसोबत करार केले आहेत.