Worrying situation at the border What did you get out of enmity with India? Such a question must have fallen to China now

दिल्ली : चीनने पूर्व लड्डाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. भारतासोबत वैर घेऊन आपल्याला काय मिळाले? असा प्रश्न आता चीनला पडला असेल. चीनच्या नापाक कारवायांविरोधात भारत कधीही एवढे कठोर पाऊल उचलणार नाही, असा विचार चीनने कधीच केला नसेल.

यावेळी चीनची पूर्ण हेकडी निघाली आहे. सीमेवर भारताची परीक्षा घेण्यासाठी चीनने प्रयत्न केले. मात्र असे करून चीनने भारतातील विश्वासार्हता गमाविली आहे. चीनने द्विपक्षीय करारांचा भंग केल्यामुळेच सीमेवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ठणकावले.

पेच कधीपर्यंत सुटेल सांगता येणार नाही

या वर्षात घडलेल्या घडामोडी अतिशय चिंता वाढविणाऱ्या आहेत. यातून काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसऱ्या पक्षाने (चीनने) ताबारेषेच्या आदराचे आणि सैन्य तैनात न करण्याचे द्विपक्षीय करार धुडकावल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अर्थात, दोन्ही देशांच्या संबंधातील पेच कधीपर्यंत सुटेल यावर भाष्य करण्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी टाळले. यावर भविष्यवाणी करता येणार नाही, असे ते म्हणाले.

चीनच्या कुरापतींमुळेच भारत एलएसीवर आक्रमक

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या घडामोडींना चीन जबाबदार असल्याचे भारताने पुन्हा एकदा म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत चीनने पूर्व लडाखमधील एलएसीची स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला होता. या कृती एलएसीच्या द्विपक्षीय करार व प्रोटोकॉलचे उल्लंघन करतात. या घडामोडी त्यामागचेच कारण आहे. सीमेवरील घडामोडींवर चीनने केलेल्या टिप्पणीवर बोलताना मंत्रालयाने चीन आपण दिलेल्या शब्दानुसार कारवाई करेल अशी अशा असल्याचे म्हटले आहे.

हिंदी महासागरात १२० नौका तैनात

हिंदी महासागरात चीनची वाढती घुसखोरी आणि आक्रमकता पाहता, त्या भागात नाविक दल अधिक सक्षम गरजेचे आहे. चीनचे आव्हान लक्षात घेता, हिंदी महासागरात १२० पेक्षा जास्त युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत.  अशी माहिती भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख जनरल बी. के. रावत यांनी दिली. हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येथे सामरिक तळ बनवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या भागात आपली हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत आहे. आम्हाला अतिरिक्त प्रादेशिक शक्ती, प्रादेशिक संपर्क आणि सहकार्यात्मक संबंधांसह धोरणात्मक स्वायत्तता राखणे आवश्‍यक आहे, असे रावत म्हणाले.