yaas cyclone

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ओडिशात ४५ आणि पश्चिम बंगालमध्ये ४५ पथके तैनात केली आहेत. पारादीप बंदरावरील कामकाज मंगळवार दुपारपासून बंद करण्यात आले असून बंदर परिसरातील मालवाहक वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच ओडिशातील क्षेपणास्र केंद्राच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत उपाय योजण्यात आले आहेत.

    भुवनेश्वर/कोलकाता : ‘यास’ हे चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकत असल्यामुळं येथील बऱ्याच भागामध्ये सोसाट्याचे वारे आणि अतीमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात वादळचाचे थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याचे मुख्य संचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिनुसार मंगळवारीच सायंकाळी या चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं. ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धमरा बंदरानजीक धडकण्याची शक्यता आहे. प. बंगालमधून ८ लाख तर, ओडिशातून ३ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून मंगळवारी दुपारपर्यंत ६० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले अहे. ‘यास’ किनारपट्टीवर धडकण्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

    कसा आहे प्रवास?
    भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगाल उपसागराच्या पूर्व-मध्य क्षेत्रात ‘यास’ चक्रीवादळ तयार होत ते उत्तर आणि वायव्येकडून पारादीपच्या दक्षिण आणि आग्नेयकडे आणि बालासोरच्या दक्षिण-आग्नेयकडे कूच करील. आज २६ मे रोजी चक्रीवादळ अधिक तीव्र होत ताशी १५५-१६५ किलोमीटर वेगाने भद्रक जिल्ह्यातील चांदबालीनजीक धडकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आणि नंतर सहा तास चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसेल.

    राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ओडिशात ४५ आणि पश्चिम बंगालमध्ये ४५ पथके तैनात केली आहेत. पारादीप बंदरावरील कामकाज मंगळवार दुपारपासून बंद करण्यात आले असून बंदर परिसरातील मालवाहक वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. तसेच ओडिशातील क्षेपणास्र केंद्राच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत उपाय योजण्यात आले आहेत.मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून दक्षिण-पूर्व रेल्वेने बुधवारपर्यंत अनेक प्रवासी विशेष रेल्वे रद्द करण्याची घोषणा केली आहे.