baba ramdev

आपण ॲलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केलं तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटलं जातं. आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा रामदेव बाबा(Ramdev Baba) यांनी दिला आहे.

    नवी दिल्ली : ॲलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने(Indian Medical Association) रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच १ जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा(Ramdev Baba) यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांची एक मुलाखत घेण्यात आली.

    या मुलाखतीत रामदेव बाबा म्हणाले की, ॲलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्स ॲप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर ॲलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी विचारला.

    त्याचबरोबर ऑक्सिजन मिळाल्यानंतरही ॲलोपॅथीची औषधं खाणाऱ्या लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण ॲलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केलं तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटलं जातं. आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही रामदेव बाबा यांनी दिला आहे.

    रामदेव बाबा म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशन हा ॲलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर हे कधीही विसरुन चालणार नाही की ॲलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कुणीही ही बाब नाकारु शकत नाही, असंही रामदेव बाबा म्हणाले.

    रामदेव बाबा म्हणाले की, आपल्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे लोक आपल्यावर जळतात. त्यांना भीती आहे की एक गरीब घरातला मुलगा अनेक मोठ्या कंपना बंद पाडेल. या सगळ्यांच्या पाठीशी अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. पण आपल्याकडे फक्त धर्म आणि सत्याची ताकद आहे. इतकंच नाही तर रामदेव बाबा यांनी ॲलोपॅथी डॉक्टरांना आव्हान देत, कुणी आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असेल तर आपणही तयार आहोत. आपण ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत नाही पण एखाद्या डॉक्टरपेक्षा त्याबाबत अधिक जाणतो, असा दावाही रामदेव बाबा यांनी केला आहे.