केरळमध्ये पुन्हा कोरोनानं डोकं काढलं वर, एका दिवसात 111 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू!

कोरोनाव्हायरसचा एक नवीन उपप्रकार, JN.1, केरळमधील अलिक्कडे येथे आढळला आहे. 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR द्वारे 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली, ज्यात विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली.

  कोरोनाचं संकट अजूनपर्यंत हद्दपार नाही झालेलं नाही आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे, केरळमध्ये कोरोना विषाणूचे नवीन सब-व्हेरियंट जेएन.१ (COVID sub variant) ची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. त्यात भर म्हणजे, भारतात आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या. सोमवारी भारतात कोरोनाव्हायरस संसर्गाची एकूण 127 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामध्ये एकट्या केरळमधील 111 प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान, देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 1828 वर पोहोचली आहे, त्यापैकी 1634 केरळमध्ये नोंदवले गेले आहेत. नुकतेच केरळमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

  केरळमध्ये आढळला नवीन प्रकार

  कोरोनाव्हायरसचा एक नवीन उपप्रकार, JN.1, केरळमधील अलिक्कडे येथे आढळला आहे. 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR द्वारे 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली, ज्यात विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे केरळमध्ये पुन्हा कोरोनानं पाय पसरण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. 2020 च्या सुरुवातीला कोविड-19 चा उद्रेक झाल्यापासून देशात 5,33,317 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड-19 लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

  केंद्राच्या JN.1 प्रकाराबाबत राज्यांना सूचना

  आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून या विषाणूचा फैलाव होण्याचा धोका शक्य तितका कमी करता येईल, असे सल्लागारात म्हटले आहे. इन्फ्लूएंझासारख्या आजारांच्या जिल्हावार आकडेवारीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत केंद्र सरकारला नियमित अपडेट देत रहा.

  नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘JN.1 हा एक गंभीर इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड आणि वेगाने पसरणारा प्रकार आहे, जो XBB आणि या व्हायरसच्या मागील सर्व प्रकारांपेक्षा स्पष्टपणे वेगळा आहे. ‘हा प्रकार ज्यांना यापूर्वी कोविड संसर्ग झाला आहे आणि ज्यांना अँटी-कोरोना लस मिळाली आहे त्यांना संसर्ग करण्यास सक्षम आहे.’