24 राज्यातील 111 जलमार्गांना राष्ट्रीय दर्जा, महाराष्ट्राचाही समावेश

देशात जल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 24 राज्यांमधील 111 जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.

    देशात जलवाहतुकीला (Waterways) प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशातील 24 राज्यांमधील 111 जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 (National Watarways Act 2016) अंतर्गत ही घोषणा करण्यात आली आहे.

    देशातील या जलमार्गांच्या तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता आणि विस्तृत प्रकल्प अहवालाच्या निष्कर्षांच्या आधारे ही घोषणा करण्यात आली आहे. 26 राष्ट्रीय जलमार्गांसाठी भारतीय अंन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणानं कृती आराखडा तयार केला आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

    महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश

    राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेल्या 111 जलमार्गांपैकी महाराष्ट्रातील चार जलमार्गांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये अंबा नदी (राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 10), दाभोळ खाडी वसिष्ठी नदी (जलमार्ग क्रमांक 28) आणि महाराष्ट्र , गुजरातला जोडणाऱ्या नर्मदा नदी (जलमार्ग क्रमांक 73) आणि तापी नदी (जलमार्ग क्रमांक 100) यांचा समावेश करण्यात आला आहे. 26 व्यवहार्य जलमार्गांपैकी पहिल्या 13 जलमार्गांसाठी विकासकामं सुरु करण्यात आली आहे.