गेल्या २४ तासात देशात १३ हजार २१६ नव्या कोरोना बाधितांची नोंद!

    गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात १३ हजार २१६ नव्या कोरोना (Corona Cases In Country) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, देशातील कोरोनाच्या रुग्ण वाढीत महाराष्ट्राने राजधानी दिल्लीलाही मागे टाकले आहे.

    देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात १३ हजार २१६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात कोरोना महामारी सुर झाल्यास आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.