दिल्लीच्या व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत २६ जणांचा मृत्यू : मुंडका मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात

इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत असताना जेसीबी मशीन आणि क्रेनच्या सहाय्याने लोकांना खाली आणण्यात आले, तर काही लोक दोरीच्या साहाय्याने खालीही आले. सध्या अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी हजर असून त्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. यासोबतच जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था घटनास्थळी करण्यात आली आहे. आगीत ६०-७० लोक अडकल्याची माहिती आहे. त्यापैकी बहुतांश जणांची सुटका करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली – दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील तीन मजली इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. आता १० जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीच्या खिडक्या तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या दोन मजल्यांचा शोध पूर्ण झाला आहे. तिसऱ्या मजल्याचा शोध सुरू आहे. दिल्ली अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आतापर्यंत २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत असताना जेसीबी मशीन आणि क्रेनच्या सहाय्याने लोकांना खाली आणण्यात आले, तर काही लोक दोरीच्या साहाय्याने खालीही आले. सध्या अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था घटनास्थळी करण्यात आली आहे. आगीत ६०-७० लोक अडकल्याची माहिती आहे. त्यापैकी बहुतांश जणांची सुटका करण्यात आली आहे.

    दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेट्रो स्टेशनच्या पिलर ५४४ जवळ बांधलेली ही इमारत ३ मजली व्यावसायिक इमारत आहे, जी ऑफिस स्पेस म्हणून कंपन्यांना भाड्याने दिली जाते. सीसीटीव्ही कॅमेरा आणि राउटर बनवणारी कंपनी असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.