कानपूर हिंसाचारप्रकरणी १८ जण अटकेत

    उत्तर प्रदेशात शुक्रवारी नमाजनंतर कानपूरच्या अनेक भागात हिंसाचार उसळला. यावेळी दोन गटांकडून दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. हिंसाचार झाला त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरमध्ये उपस्थित होते.

    कानपूरच्या परेड स्क्वेअरवर भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील काही लोकांकडून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वाद निर्माण झाला आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सध्या येथील परिस्थिती सामान्य असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.