केरळच्या कोल्लमनंतर कन्नूरमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण

    नवी दिल्ली – जगभरातील 76 देशांत पाय पसरणारा मंकीपॉक्स आता भारतातही पोहोचला आहे. केरळच्या कन्नूर शहरात सोमवारी या आजाराचा दुसरा रुग्ण आढळला. तत्पूर्वी, गुरूवारी केरळच्याच कोल्लममध्ये मंकीपॉक्सच्या एका रुग्णाची पुष्टी झाली होती.
    राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दुसरा रुग्ण 31 वर्षांचा तरुण आहे. तो 13 जुलै रोजी दुबईहून मंगळुरु विमानतळावर उतरला होता. यापूर्वी 35 वर्षीय रुग्ण संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) कोल्लमला आला होता. तपासणीअंती त्याच्यात मंकीपॉक्सची लक्षणे आढळली होती.

    मंकीपॉक्सचा वेगवान प्रसार पाहता केंद्र सरकार सावध झाले आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी योग्य ते दिशानिर्देश जारी केले. यात परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांची टेस्टिंग, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची निगराणी व उपचार करण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे.