
नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रश्नांवरती काम होत नसल्यामुळे राज्यातील २० खासदारांनी केंद्रीय रेल्वे समितीतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात पुणे आणि सोलापूर विभागातील खासदारांचा समावेश असून त्यांनी आपला राजीनामा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे दिला आहे. रेल्वेच्या प्रश्नावर रेल्वेची एक समिती गठित करण्यात येते. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांचा देखील समावेश आहे मात्र रेल्वे विभागाच्या माध्यमातून कोणतंही काम होत नाहीत अशी तक्रार राजीनामा दिलेल्या खासदारांची आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात या समितीतील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. तुमची कामं लवकरात लवकर मार्गी लावली जातील, असे देखील आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले. मात्र, कोणतीही काम होत नसल्याच्या भावनेतून या खासदारांनी राजीनामे केंद्रीय मंत्र्यांकडं दिले आहेत. मंगळवारी या खासदारांची बैठक होणार असून या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या समित्या असून या समितीत संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह सदस्य देखील असतात.सदस्यांना आपल्या भागातील कामं व्हावीत, अशी अपेक्षा असते. पण, समितीत राहूनही कामं होत नसल्याल तर नाराजी निर्माण होते. अशाच प्रकारच्या नाराजीतून या खासदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पण, आता हे राजीनामे केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी गंभीरतेने घेतल्याचं दिसून येतं.