रक्षाबंधनच्या मुहूर्तावर मोदींचे 200 तर कॉंग्रेसचे कर्नाटकात 2000; निवडणुकीच्या वर्षात महिलांसाठी भेटीचा वर्षाव

  Lok Sabha Election 2024 : कर्नाटक सरकारने निवडणुकीपूर्वीच काही वचन जनतेला केली होती. आता ही वचने पूर्ण करण्याचा सपाटा कर्नाटक सरकारने लावला आहे. रक्षाबंधनच्या मुहूर्तावरच त्यांनी कर्नाटकमधील प्रत्येक महिलेला 2000 रुपये देण्याची केलेली घोषणा आता ते पूर्ण करीत आहेत.

  कर्नाटकात दर महिना 2 हजार रुपयांचा भत्ता

  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आता अवघे काही महिने उरले आहेत. पुढील वर्ष हे निवडणुकीचे असणार आहे. काल गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपातीच्या दराने याची चाहूल लागली. आता आज कॉंग्रेस (Congress) कर्नाटकात महिलांना दर महिना 2 हजार रुपयांचा भत्ता देणारी योजना लागू करीत आहे. 200 विरुद्ध 2 हजारांची ही लढाई निवडणुकीच्या मैदानात कोण जिंकणार हे येत्या काळातच कळणार आहे.

  कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ

  काल गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात झाली आणि ही देशातल्या तमाम महिला वर्गांसाठी मोदींकडून रक्षाबंधनाची भेट असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले. आज याच महिलांसाठी काँग्रेस कर्नाटकमध्ये एक भेट जाहीर करीत आहे. ही भेट आहे दरमहिना 2000 रुपयांची. त्यामुळे रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर 200 विरुद्ध 2000 ची ही लढाई राजकीय पक्षांत सुरू असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ आज राहुल गांधींच्या उपस्थितीत करण्यात आला. कर्नाटकच्या निवडणुकीत मतदारांना काँग्रेसनं जी पाच प्रमुख आश्वासनं दिली होती. त्यापैकी एक आहे गृहलक्ष्मी योजना.

  महिलांना दरमहिना 2 हजार रुपये देणारी योजना आहे तरी काय?

  • प्रत्येक घरातल्या प्रमुख महिलेला दर महिना 2 हजार रुपये दिले जातील
  • त्यासाठी कर्नाटक सरकारनं वार्षिक 32 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे
  • अंत्योदय, बीपीएल आणि एपील ( अबोव्ह पॉव्हर्टी लाईन) रेशन कार्ड धारक महिलांना याचा लाभ मिळणार
  • प्रत्येक कुटुंबातल्या एकाच महिलेच्या नावावर हे पैसे मिळतील
  • सरकारी नोकरदार महिला, करदात्या महिला किंवा ज्यांच्या कुटुंबात इनकम टॅक्स, जीएसटी भरला जातो, त्यांना यातून वगळण्यात आलंय
  • कर्नाटकात 1.1 कोटी महिलांनी आत्तापर्यंत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.

  केंद्र सरकारनं 7 हजार कोटींचा बोजा केला सहन

  काल केंद्र सरकारनं 7 हजार कोटींचा बोजा सहन करत गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. आता कर्नाटक सरकारनं केवळ या एकाच वर्षात 17 हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी बाजूला काढली आहे.

  काँग्रेसच्या पाच प्रमुख आश्वासनांपैकी एक योजना

  गृहलक्ष्मी ही कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाच प्रमुख आश्वासनांपैकी एक योजना. या पाचपैकी तीन योजना काँग्रेसनं आधीच लागू केल्या आहेत. शक्ती, गृहज्योती आणि अन्नभाग्य या तीन योजना कर्नाटक सरकारनं आधी लागू केल्या आहेत. गृहलक्ष्मीनंतर युवा निधी या योजनेंतर्गत काँग्रेस बेरोजगार युवकांनाही बेरोजगार भत्ता देणार आहेत.

  पुढील वर्ष लोकसभा निवडणुकीचे

  अर्थव्यवस्थेसाठी अशा लोकानुयायी योजना किती लाभदायक हा चर्चेचा विषय आहे. पण वर्ष निवडणुकीचं आहे. काल भाजपकडूनही गॅस दरातल्या कपातीचा जोरदार गवगवा करण्यात आला. आता काँग्रसेनं तर थेट महिलांच्या खात्यात दरमहिना 2 हजार रुपये द्यायला सुरुवात केलीय. दोन्ही पक्ष याला महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणतायत. पण याची परतफेड करताना महिला मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणं महत्वाचं असेल.