काँग्रेस खासदाराचं पैशाचं घबाड काही संपेना, आतापर्यंत 351 कोटींची रोकड जप्त; अजुनही मोजणी सुरूच!

पैशाची मोजणी लवकरात लवकर पूर्ण करता यावी म्हणून आणखी मशीन्स बसवण्यात आल्या आहेत.

  झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू (dhiraj sahoo) सध्या चर्चेत आहे. धीरज साहू यांच्याकडे पैशाचं घबाड सापडलं आहे. गेल्या चार-पाच दिवसापुर्वी आयकर विभागाने धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओडिशा येथील काही ठिकाणांवर छापा मारला. या दरम्यान रोख रक्कम असलेल्या पैशाच्या बॅग सापडल्या. या बॅगमधून आणि इतर ठिकाणांवरुन जवळपास ३५१ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. पैशांची ही मोजमाप अजुनही सुरुच असून आयकर विभागाचे कर्मचारी सध्या नोटा मोजत आहेत.

  नेमका प्रकार काय?

  काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरात इतक्या नोटा सापडल्या आहेत की, आयकर विभागालाही त्यांची मोजणी करताना नाकी नऊ आले आहे. आतापर्यंतच्या मोजणीत 351 कोटी रुपये आढळले असून, अजुनही आयकर विभागाचे कर्मचारी पैशांची मोजणी करत आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, एकाच छाप्यात आतापर्यंत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रोख रक्कम आहे. प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबर रोजी छापे टाकले होते आणि एकूण 176 पिशव्या सापडल्या होत्या, त्यापैकी 140 पिशव्या मोजल्या गेल्या आहेत.

  पैसै मोजण्यासाठी 40 मशीन

  प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारपर्यंत मतमोजणी पूर्ण करायची होती. मात्र रविवार उलटुनही मोजणी सुरुच आहे.  नोटांनी भरलेल्या 176 पिशव्यांपैकी 140 गोण्यांची मोजणी झाली असून सोमवारी 36 बॅगांची मोजणी सुरू आहे. नोटा मोजण्यासाठी तीन बँकांचे 50 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रोख मोजणीसाठी 40 मशिन बसवण्यात आल्या आहेत. सोमवारपर्यंत सर्व रोकड मोजली जाईल आणि सर्व मशिन बँकांमध्ये परत येतील, असे त्यांनी सांगितले.

  जास्त मशीन्स का बसवल्या आहेत

  अधिका-यांनी सांगितले की इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसै होते की अधिकाऱ्यांना मशिनमार्फत पैसै मोजण्यासाठीही वेळ लागत होता. त्यामुळे मोजणी लवकरात लवकर पूर्ण करता यावी म्हणून आणखी मशीन्स बसवण्यात आल्या. बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही काही अभियंते देखील तैनात केले आहेत जेणेकरुन मशीनमध्ये काही समस्या उद्भवल्यास त्या त्वरित दुरुस्त करता येतील. रविवारी काही व्हिडिओ क्लिपही समोर आल्या आहेत, ज्यामध्ये अधिकारी रोख मोजताना दिसत आहेत.