सावकाराच्या छळाला कंटाळून एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले जीवन

कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सदाशिवनगर भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले. आर्थिक चणचण आणि सावकराकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पाचही जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

  तुमकुरु : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सदाशिवनगर भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले. आर्थिक चणचण आणि सावकराकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पाचही जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. जीवन संपवण्याच्या काही मिनिटे आधी, कुटुंब प्रमुख गरीब साब यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली होती.

  विशेष म्हणजे, एक व्हिडिओदेखील बनवला होता. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा एक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गरीब साब यांच्या कुटुंबाचा कसा छळ केला. त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले, असे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

  या घटनेबाबत पोलिसांनी सोमवारी सांगितले की, तुमकुरु शहरात रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपींनाही ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर, अवाजवी व्याजदर आणि छळाला कंटाळून कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  धक्कादायक म्हणजे या कुटुंबाकडे आरोपींचे लाख रुपये थकीत होते. गरीब साब (36), पत्नी सुमैया (32) मुलगी हजिरा (14), मुलगा मोहम्मद शाभान (10) आणि मोहम्मद मुनीर (8) अशी मृतकांची नावे आहेत.

  मारहाणही करायचा

  आत्महत्येपूर्वी साब यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘तळमजल्यावर एक कलंदर राक्षस राहतो. तो पत्नी आणि मुलांचा छळ करतो आणि मारहाणही करतो. कलंदर अपशब्दांचाही प्रयोग करतो. माझी पत्नी आणि मुलांना भीती वाटते की, मी मेलो तर त्यांना तो सोडणार नाही. माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलेही आत्महत्या करत आहेत’.