जदयुचे ६ आमदार भाजपात; नितीशकुमारांना जोरदार धक्का

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयूने १५ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी ७ जागांवर जदयुने विजय संपादून करून राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

पाटणा. भारतीय जनता पार्टीने रालोआमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांचे सहा आमदार फोडले आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अरुणाचल प्रदेशसह दिल्ली आणि बिहारचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जदयूने २६ नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यावाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व त्यांना निलंबीतदेखील केले होते.

हे योग्य नाही : जदयु
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयूने १५ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी ७ जागांवर जदयुने विजय संपादून करून राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपा (४१) नंतर जदयु अरुणाचलमध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता भाजपाने जदयुच्या ६ आमदारांना फोडून आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. यावर जदयुकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, भाजपने हे योग्य केले नाही, असे जदयुच्या गोटात बोलले जात आहे. या प्रकारामुळे भाजप आणि जदयुत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.