आसाम-मेघालय बॉर्डरवर हिंसाचार, पोलिसांच्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती लगतच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. सकाळी ५ च्या सुमारास ही कुमक पोहोचताच स्थानिक नागरिक हातात शस्त्र घेऊन तिथे धडकले. त्यांनी तस्करांना सोडण्याची मागणी करत वन रक्षक व पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागला.

    नवी दिल्ली – लाकडाची तस्करी रोखण्याच्या मुद्यावरून मंगळवारी भयंकर हिंसाचार झाला. त्यात एका वन रक्षकासह ६ जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांनी लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या एका ट्रकला थांबवले होते. त्यानंतर हा हिंसाचार झाला. खबरदारी म्हणून या भागातील ७ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

    पश्चिम कार्बी आंगलोंगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालयच्या सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा एक ट्रक थांबवला होता. त्यानंतरही ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी वन रक्षकांनी गोळीबार केला. त्यात ट्रकचे टायर पंक्चर झाले. त्यानंतर ट्रक चालकासह ३ जणांच्या मुसक्या आवळल्या. इतर संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती लगतच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. सकाळी ५ च्या सुमारास ही कुमक पोहोचताच स्थानिक नागरिक हातात शस्त्र घेऊन तिथे धडकले. त्यांनी तस्करांना सोडण्याची मागणी करत वन रक्षक व पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात वन रक्षकाचा मृत्यू झाला. तसेच मेघालयच्या ५ नागरिकांचाही बळी गेला. हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन रक्षकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.