खड्ड्यात पडून 2 वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू, पत्नी आजारी असतानाही पोलीस बापाला सुट्टी नाकारली, संतापात मृतदेह घेऊन बाप थेट एसपी ऑफिसात, म्हणाला..’ या मृत्यूला कोण जबाबदार?’

पोलीस कॉलनीत राहत असलेल्या एका पोलिसाचा दोन वर्षांचा मुलगा खेळत असताना गढूळ पाणी असलेल्या खड्ड्यात पडला, घटनास्थळीच त्या लहानग्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ सुट्टी देत नसल्यानं हा प्रकार घडल्याची खंत त्या पोलिसाला टोचत होती.

    इटावा : कोणत्याही माणसाच्या ह्रदयाला पीळ पडेल अशी घटना समोर आलीय. पोलीस कॉलनीत राहत असलेल्या एका पोलिसाचा दोन वर्षांचा मुलगा खेळत असताना गढूळ पाणी असलेल्या खड्ड्यात पडला, घटनास्थळीच त्या लहानग्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ सुट्टी देत नसल्यानं हा प्रकार घडल्याची खंत त्या पोलिसाला टोचत होती. या मुलाची आई आजारी होती, त्यामुळं मुलाकडं लक्ष देता यावं, यासाठी हा पोलीस अनेक दिवसांपासून सुट्टी मागत होता. मात्र त्याला सुट्टी देण्यात आली नव्हती. मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेला हा पोलीस बाप लहानग्या २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घेऊन थेट पोलीस स्टेशनात पोहचला.

    नेमकं काय घडलं ? 

    बुधवारी सकाळी २ वर्षांचा हर्षित खेळता खेळता घराच्या बाहेर गेला. पाणी भरलेल्या एका खड्ड्यात खेळता खेळता तो पडला. घरातले या लहानग्याला शोधत होते, मात्र हर्षित कुठचं सापडत नव्हता. अखेरीस खड्ड्यात तर तो पडला नाही ना, असा संशय घरच्यांना आला. त्यानंतर या खड्ड्यातील पाणी उपसण्यात आलं. तिथं या दोन वर्षांच्या या लहानग्याचा मृतदेह सापडला.

    पत्नी आजारी असल्यानं मुलाकडं होत होतं दुर्लक्ष

    हा पोलीस शिपाई सोनू हे मुळचे मथुरेचे रहिवासी आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांची पत्नी कविता आजारी पडली होती. तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी आणि २ वर्षांच्या बाळाकडं लक्ष देता यासाठी ते शिपाई सोनू सुट्टीची विनंती वरिष्ठांकडे करत होते. मात्र वरिष्ठ त्यांना सुट्टी देण्यास टाळाटाळ करत होते. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर पोलीस सोनू आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अतिशय दुर्दैवी रित्या या २ वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाला.

    मुलाचा मृतदेह घेऊन थेट एसपी ऑफिस गाठलं 

    सुट्टी मिळाली नसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्यानं, या मृत्यूला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचं पोलीस सोनू यांचं म्हणणंय. जर सुट्टी मिळाली असती तर सोनूचा जीव वाचला असता असंही ते सांगतायेत. याच रागात २ वर्षांच्या लहानग्या हर्षितचा मृतदेह घेऊन या पोलीस बापानं थेट कलेक्टर ऑफिसमध्ये असलेल्या एसपी कार्यालयात धाव घेतली. त्या ठिकाणी कार्यालयात त्यानं मृतदेहासह ठिय्या आंदोलनच सुरु केलं. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी सोनूची समजूत काढण्यात मग्न होते. अखेर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर रडत रडतच सोनू मुलाचा मृतदेह घेऊन घरी परतला.

    एकुलता एक मुलगा हरपल्याचं अति दु:ख

    पोलीस सोनू यांनी सांगितलं की ७ जानेवारीपासून पत्नीची प्रकृती ठीक नसल्याचं सांगून रजा देण्याचं विनंती पत्र एसपींना दिलं होतं. पत्नीवर उपचार करायचे होते आणि मुलाकडं लक्ष द्यायचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र वरिष्ठांनी याकडं सोयिस्कर दुर्लक्ष केलं. जर सुट्टी मिळाली असती तर कदाचित मुलगा जिवंत राहिला असता. आपल्या मोठ्या भावालाही मूलबाळ नाही, आमच्या घरात असलेल्या एकुलत्या एका मुलाचा असा मृत्यू झालाय. अशी नोकरी करायची तरी काय, असा प्रश्नही सोनूनं विचारलाय. सगळ्याच पोलीस यंत्रणेला या प्रश्नाचं उत्तर देता येईल का, हा खरा प्रश्न आहे.