चांद्रयान 3 च्या लॅंडिंगपूर्वीच सरकारी कंपनीने शेअर बाजारात गाठला उच्चांक, नवीन रेकॉर्डची नोंद

    Chandrayaan 3 Updates : आज केवळ भारतच नाही तर जगभरात चांद्रयान 3 ची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी झाली. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान 3 वर लागल्या आहेत आणि संपूर्ण जग यासाठी प्रार्थना करीत आहे.
    अनेक कंपन्यांचे इस्रोमध्ये योगदान
    अनेक कंपन्यांनी इस्रोमध्ये योगदान दिले आहे. आज चांद्रयान 3 च्या आधारे एका सरकारी कंपनीने इतिहास रचला आहे. ही सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. HAL ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जुनी एरोस्पेस कंपन्यांपैकी एक आहे. ज्याने इस्रोला चांद्रयान 3 च्या चंद्र मोहिमेत खूप मदत केली आहे. जर चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले तर जगात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अधिक मजबूत होईल.
    कंपनीने रचला इतिहास
    इस्रोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मोठे योगदान आहे. याच कारणामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार कंपनीचा शेअर 4,024 रुपयांवर पोहोचला आहे. सुमारे 25 दिवसांत कंपनीने आपला विक्रम मोडला आहे. यापूर्वी 31 जुलै रोजी कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता.
    कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ
    सकाळपासून एचएएलच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. दुपारी 12.50 वाजता कंपनीचा शेअर 3.19 टक्क्यांनी म्हणजेच 124.05 रुपयांच्या वाढीसह 4015.05 रुपयांवर व्यवहार करीत आहे. आज कंपनीचा शेअर तेजीसह 3914.95 रुपयांवर उघडला. कंपनीचा शेअर एका दिवसापूर्वी 3,891 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते.
    कंपनीला 4,400 कोटींचा नफा
    शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,34,557.52 कोटी रुपये होते. आज दुपारी 12.50 वाजता कंपनीच्या शेअरने 4,024 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,30,110.17 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचा अर्थ आज काही तासांत कंपनीने 4,447.35 कोटी रुपये कमावले आहेत.
    चंद्र मोहिमेत एचएएलचे योगदान
    चांद्रयान 3 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजला (एनएएल) घटकांचा पुरवठा केला आहे जे मिशनमध्ये उपयुक्त ठरत आहेत. कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती आणि दुरुस्ती आणि देखभाल करते. कंपनीला जून तिमाहीत 814 कोटी रुपयांचा नफा झाला होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त होता.
    नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.