मुस्लिम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न; आता पोलिसांकडे केलीये सुरक्षेची मागणी

आणंद जिल्ह्यातील खंभाट इथं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. इथं राहणाऱ्या एका मुस्लीम मुलीनं एका हिंदू मुलाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला असून, तिच्या कुटुंबीयांकडून धमक्या मिळत असल्यानं तिनं पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

  सुरत : हिंदू धर्मातील मुलींशी प्रेमाचे नाटक करून त्यांच्याशी विवाह करून त्याचं धर्मांतर करण्याच्या प्रकाराला लव्ह जिहाद (Love Jihad) म्हणून ओळखलं जातं. यामध्ये बऱ्याचदा मुलींची फसवणूक होते. त्यांचा छळ केला जातो. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यानं गुजरात सरकारनं (Gujrat State Government) फ्रीडम ऑफ रिलीजन रिफॉर्म (Freedom of Religion Reform) कायदा केला आहे.

  हा कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत गुजरातमध्ये लव्ह-जिहादची दोन प्रकरणं दाखल झाली आहेत. त्याचवेळी आणंद जिल्ह्यातील खंभाट इथं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. इथं राहणाऱ्या एका मुस्लीम मुलीनं एका हिंदू मुलाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला असून, तिच्या कुटुंबीयांकडून धमक्या मिळत असल्यानं तिनं पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. न्यूज १८ लोकमत डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  फरमीन बानो (Farmeen Bano) असं या मुलीचं नाव असून, तिनं आपला प्रियकर प्रदीप पुराणी (Pradip Purani) याच्याशी विवाह केला आहे. १९ जून रोजी या दोघांनी कोर्टात लग्न केलं असून त्यासाठी १७ जून रोजी फरमीन बानू यांनी आपलं घर सोडलं होतं. या दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या तिच्या कुटूंबाकडून (Life Threats from Family) मिळत असल्यानं आपल्याला पोलिस संरक्षण (Police Protection) मिळावं असा अर्ज तिनं केला आहे.

  या अर्जात तिनं आपले वडील मोहम्मद फुरकान सय्यद, मामा ऐजाज सय्यद आणि इतर नातेवाईक ताकीर सय्यद, फिरोज पठाण उर्फ (फंटर), सोहिल, सद्दाम सय्यद (चप्पल), हमदान सय्यद, तौसेफ सय्यद आणि जमशेद पठाण यांच्या नावांचा उल्लेख केला असून, आमचं काही बरंवाईट झाल्यास हेच लोक त्यासाठी जबाबदार असतील, असंही तिनं म्हटलं आहे.

  दरम्यान, फरमीननं लग्नानंतर त्या दोघांचा एक व्हिडिओही बनवला होता. यामध्ये फरमीन आणि प्रदीप आपल्या सुरक्षिततेसाठी विनवणी करताना दिसत आहेत. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता, तो चांगलाच व्हायरल झाला होता.

  ‘प्रदीप पुराणी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप आधीच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही दोघंही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान आहोत. आपण प्रदीपशी स्वेच्छेनं लग्न केलं असून, खूप आनंदी आहोत, मात्र आपल्या घरच्यांना याचा राग आल्यानं ते आमच्यावर प्राणघातक हल्ला करू शकतात, असं फरमीन बानो हिनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

  आपण घरातून नेसत्या वस्त्रानिशी रिकाम्या हातानं बाहेर पडलो असून तिथून काहीही आणलेलं नाही. आपल्यावर कोणतेही आरोप लादले जाऊ नयेत यासाठी मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करत आहे, असंही फरमीननं यात नमूद केलं आहे. लव्ह जिहादच्या अगदी विरुद्ध असं हे प्रकरण पुढं आल्यानं सर्वांच लक्ष याकडे वेधलं गेलं आहे.

  a muslim girl got married to a hindu boy now she has demanded security from the police in case against love jihad