बिहारमध्ये भरधाव ट्रकची रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना धडक, 12 जणांचा मृत्यू

बिहारच्या हाजीपूर जिल्ह्यातील सुलतानपूर गावात देसरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

    बिहार : बिहारमधून अपघाताची एक मोठी घटना समोर येत आहे. हाजीपूर जिल्ह्यातील सुलतानपूर गावात रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नंरेद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री यांनी अपघातावर नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

    रविवारी रात्री एका भरधाव ट्रकनं रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील काही लोकं परिसरातील स्थानिक देवता ‘भूमिया बाबा’ची पूजा करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या पिंपळाच्या बाजूला एकत्र जमले होते. यावेळी पुजा सुरू असताना भरधाव येणाऱ्या ट्रकनं एकत्र जमलेल्या लोकांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

    “गावकरी लग्नाशी संबंधित प्रथेनुसार मिरवणूक काढण्यासाठी एकत्र जमले होते. जवळच्या सुलतानपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी लग्न होतं. महनर-हाजीपूर महामार्गालगत भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे अपघात झाला.” अशी माहिती वैशालीचे पोलीस अधिक्षक मनीष कुमार यांनी दिली.