‘आप’चा गुजरात विधानसभेत प्रवेश; राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येणार

आता आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येत आहे. राष्ट्रीय राजकारणात शिक्षण, आरोग्य यावर आधारित राजकारणाला महत्त्व येत आहे, असे मनिष सिसोदिया म्हणाले आहेत.

    नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) भाजपला (BJP) १५४ जागांवर आघाडीवर आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसला (Congress) या निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. मात्र, ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी (AAP) विशेष ठरली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आप गुजरात राज्यात प्रवेश करत आहे. तसेच, राष्ट्रीय पक्ष (National Party) म्हणून मान्यता मिळणार आहे.

    आता आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येत आहे. राष्ट्रीय राजकारणात शिक्षण, आरोग्य यावर आधारित राजकारणाला महत्त्व येत आहे, असे मनिष सिसोदिया म्हणाले आहेत.

    गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आम्ही गुजरातमध्ये जिंकत आहोत, माझ्याकडून लिहून घ्या, असे विधान केले होते. विशेष म्हणजे काही माध्यमांसमोर त्यांनी तसे लिहूनही दिले होते. प्रत्यक्ष मात्र या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून ते सत्ता स्थापन करत आहेत. दुसरीकडे सत्ता स्थापन करता आली नसली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून आप पक्ष गुजरात राज्यात प्रवेश करत आहे. कारण सध्या आप पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहे. तसेच आम आदमी पार्टीला आतापर्यंत १२.७५ टक्के मते मिळाली आहेत. याच कारणामुळे आप पक्षाकडून समाधान व्यक्त केले.