
पुणे पोलिसांनी कोथरूड भागात मोस्ट वाँटेंड दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पोलिसांना चकमा देऊन पळालेल्या त्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. त्याला दिल्लीतून अटक केली असून, तो आयएसआयएस पुणे मॉड्यूलच्या प्रकरणात फरार झाला होता.
पुणे : पुणे पोलिसांनी कोथरूड भागात मोस्ट वाँटेंड दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पोलिसांना चकमा देऊन पळालेल्या त्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. त्याला दिल्लीतून अटक केली असून, तो आयएसआयएस पुणे मॉड्यूलच्या प्रकरणात फरार झाला होता. तेव्हापासून तपास यत्रंणा त्याचा शोध घेत होते. परंतु, तो सापडत नव्हता. मोहम्मद शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (वय ३२) असे पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.
पुणे पोलिसांच्या कोथरूड पोलीस पथकाने गस्तीदरम्यान १८ जुलै २०२३ पहाटेच्यावेळी दुचाकी चोरीच्या संशयातून तीन जणांना पकडले होते. पोलिसांच्या चौकशीत मात्र धक्कादायक माहिती समोर आली आणि देशभरात खळबळ उडाली. हे तिघे मोस्ट वाँन्टेड दहशतवादी असल्याचे समोर आले. परंतु, त्याचवेळी राहत्या खोलीवर जात असताना मोहम्मंद याने पळ काढला होता. दोघा दहशतवाद्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. देशभरात दहशतवादी कारवाई करण्याचा कट रचत असल्याचे तसेच त्यांनी पुणे व कोल्हापूर भागातील जंगलात बॉम्बची चाचणी घेतल्याचेही समोर आले होते. त्यांच्याकडून पुण्यासह अनेक महत्वाच्या ठिकाणचे नकाशे व फोटो असल्याचेही समोर आले होते.
दरम्यान, हा तपास प्रथम पुणे पोलिसांकडे होता. त्यानंतर तो एटीएसकडे देण्यात आला. एटीएसने पुण्यासह इतर शहरातून या दहशतवाद्यांना मदत व सहकार्य करणाऱ्यांना अटक केली होती. एटीएसने तपास केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग झाला. सध्या या गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे. तत्पुर्वी पुण्यातून पळालेल्या मोहम्मद याचा तपास यंत्रणांकडून कसून शोध सुरू होता. गेल्या अडीच महिन्यांपासून गायब होता.
दरम्यान, मोहम्मद याच्यासह रिझवान अब्दुल हाजीअली (वय २८), अब्दुल्ला फयाज शेख (वय २८), तल्हा लियाकत खान (वय ३२) या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाखांचे बक्षीस जाहिर केले होते. हे चौघेही मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोहम्मंदची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याच्यासोबत आणखी एक पोलिसांना सापडला असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुणे आयएसआयएस मोड्युलमध्ये आता नेमकी काय माहिती समोर येणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तपास यत्रंणेसाठी हे मोठे यश मानले जात आहे.