अदानी समूह चक्रव्यूहात; जेपीसी, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशीची मागणी; ९ पक्षांनी संसदेत दिली नोटीस

हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani) समूहासमोरील आव्हाने दिवसेंदिवसे वाढत आहेत. अदानी ग्रुपने (Adani Group) एफपीओ रद्द केल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी संसदेत रान उठवले आहे.

    दिल्ली : हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani) समूहासमोरील आव्हाने दिवसेंदिवसे वाढत आहेत. अदानी ग्रुपने (Adani Group) एफपीओ रद्द केल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी संसदेत रान उठवले आहे. विरोधकांनी गौतम अदानी यांच्याविरुद्ध होत असलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, काँग्रेससह अन्य १३ विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करीत संसदेच्या दोन्ही सभागृहात अक्षरशः गोंधळ घातल्याने संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले. अदानी समूहाने बुधवार अचानक अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये गौतम अदानी स्वतः आपल्या एफपीओमध्ये मोठी गुंतवणूक करणार होते असेही म्हटले होते.

    ९ पक्षांनी संसदेत दिली नोटीस

    अदानी समूहाच्या परिस्थितीबाबत संसदेत चर्चेसाठी ९ पक्षांनी नोटीस दिली होती. लोकसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधक आक्रमक झाले. त्यांनी ‘अदानी’ समूहाच्या मुद्यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी लावून धरली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावली.

    आरबीआयने बँकांना मागितली कर्जाची माहिती

    अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. अदानीचे शेअर्सही घसरले आहेत, तर एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनवीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आरबीआयनेही याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बँक नियामक आरबीआयने अदानी प्रकरणात सर्व बँकांकडून अहवाल मागवला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांना किती कर्ज दिले आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा आरबीआयने सर्व बँकांना केली आहे.

    प्रकरणाचा सारांश

    अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिडेनबर्गने नुकताच एक रिपोर्ट जारी केलाय. भारतातील अदानी समूहावर या रिपोर्टमध्ये फसवणुकीचे आरोप केले आहेत. ३२ हजार शब्दांच्या या रिपोर्टमध्ये १८८ प्रश्नांचा समावेश आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्समध्ये हेराफेरी आणि खातेधारकांची फसवणूक करत असल्याचा दावा हिडेनबर्गच्या या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

    अदानी हे पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय असल्याने ते या मुद्यावर शांत आहेत. अमृतकाळातील हा महाघोटाळा आहे.

    - संजय सिंह, खासदार, आप

    लोकांचे पैसे काही कंपन्यांना दिले जात आहेत, अशा बातम्यांमुळे कंपनीचे शेअर्स पडले आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटना सभागृहात मांडल्या पाहिजेत. म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस देतो तेव्हा ती फेटाळली जाते.

    - मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, कॉंग्रेस

    भाजपाच्या काही नेत्यांना फायदा व्हावा यासाठी एलआयसी आणि राष्ट्रीयीकृत बँकेत जमा असलेल्या पैशांचा वापर केला जात आहे.

    - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल