
OCCRP Report on Adani : इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून अदानींवरून भाजपला घेरण्याचा प्लान असताना, अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका नव्या अहवालात असे म्हटले आहे की, अदानी कुटुंबातीलच भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'अपारदर्शक' फंडांचा वापर केला आहे.
OCCRP Report on Adani Group : ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने भारतातील अदानी ग्रुपला पुन्हा लक्ष्य केले आहे. अदानी समूहाने (Adani Group) आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ‘ओसीसीआरपी’चा आरोप आहे. आदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ओसीसीआरपी ही ना नफा ना तोटा तत्वावर चालवली जाणारी स्वयंसेवी संस्था असल्याचा दावा केला जात असला तरी अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर बंधू हे या संस्थेचे पाठीराखे असल्याचं सांगितलं जातं. जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्सची भारत विरोधी मांडणी ही जगजाहीर आहे. भारतातील मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या अदानी समुहावर यापूर्वी शॉर्ट सेलर हिंडनबर्गने आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपामुळे भारतीय शेअर बाजारात अदानीच्या शेअर्सला अभूतपूर्व घसरणीचा सामना करावा लागला होता.
On allegations of OCCRP, Adani Group says "We categorically reject these recycled allegations. These news reports appear to be yet another concerted bid by Soros-funded interests supported by a section of the foreign media to revive the meritless Hindenburg report. In fact, this… pic.twitter.com/hOfRU4BUSN
— ANI (@ANI) August 31, 2023
ओसीसीआरपीने आज नव्या आरोपांची राळ उठवली
हिंडनबर्गच्या हल्ल्यातून अदानी समूह सावरत असतानाच, ओसीसीआरपीने आज नव्या आरोपांची राळ उठवली आहे. ओसीसीआरपीच्या या ताज्या अहवालाकडे हिंडनबर्ग 2 म्हणून पाहिले जात आहे. ओसीसीआरपीने कथित रिसर्च केलेले दस्तावेज गार्डियन आणि फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्रांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी वृत्तांत प्रकाशित केल्यानंतर आज भारतात त्याचे पडसाद उमटले. मात्र, अदानी समूहाने हिंडनबर्ग रिसर्च तसेच आता झालेले सर्व आरोप फेटाळत असतानाच भारतविरोधी दृष्टीकोनातून खोडसाळपणे आरोप केले जात असल्याचा दावा केलाय. भारतातील सर्व तपासयंत्रणांनी अदानी समुहाला क्लीन चिट दिल्याचा दावा अदानी समुहाने केला आहे.
ओसीसीआरपी अदानी समुहाचे व्यवहाराची छानणी करत असून लवकरच ते एक अहवाल जारी करणार असल्याच्या बातम्या आठवडाभरापूर्वीच प्रकाशित झाल्या होत्या.
हिंडनबर्ग अहवालानंतरही अदानी समुहाने, हिंडनबर्ग अहवाल हा काही भारतविरोधी संस्था तसंच व्यक्तींचं कारस्थान असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जॉर्ज सोरोस यांच्यावर जाहीर टीका करत त्यांच्या भारत विरोधी दृष्टीकोनावर आक्षेप नोंदवले होते.
मॉरिशसमधील दोन व्यवहारांचा घेतला शोध
ओसीसीआरपीच्या ताज्या अहवालात, असं सांगण्यात आलंय की, त्यांनी अदानी समुहाच्या मॉरिशसमधील दोन व्यवहारांचा शोध घेतला. यासाठी त्यांनी अदानी समूह आणि संबंधित गुंतवणूकदार यांच्यातील ईमेलही तपासल्याचा दावा केला आहे. मॉरिशस मार्गे भारतात गुंतवणूक करुन अदानी समुहाने आपल्याच पैशाने आपले शेअर खरेदी करुन समुहातील शेअर्सचं मूल्य वाढवल्याचा त्यांचा दावा आहे. अदानी कुटुंबासोबत जुने आर्थिक हिंतसंबंध आणि व्यवहार असलेले दोन गुंतवणूकदार, नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मॉरिशसमार्गे गुंतवणूक करत होते. खरं तर हे दोघे गौतम अदानी यांचे बंधू असलेल्या विनोद अदानी यांच्या काही कंपन्यांमध्ये संचालक आहेत. म्हणजेच अदानी कुटुंबीयांनी त्यांचे पैसे विदेशातून भारतात पुन्हा त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवून भारतातील कंपन्यांचं मूल्य वाढवल्याचा ओसीसीआरपीचा आरोप आहे. हाच आरोप यापूर्वी शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने केला होता.
गार्डियन आणि फायनान्शियल टाईम्समध्ये ओसीसीआरपीच्या अहवालावरील वृतांत प्रकाशित झाल्यानंतर, अदानी समुहाच्या वतीने जारी स्पष्टीकरणात असं म्हटलंय की हे सर्व हिंडनबर्गने यापूर्वी केलेलेच आरोप आहेत. आधीच्या आरोपांमध्ये थोडासा फेरफार करुन पुन्हा तेच आरोप नव्याने करण्यात आले आहेत. साधआरणपणे दशकभरापूर्वीच जी प्रकरणे तपासानंतर बिनबुडाचे आरोप समजून बंद करण्यात आलेली आहेत, त्याच पुन्हा पुन्हा उल्लेख केला जात आहे. हे आरोप जॉर्ज सोरोस आणि त्याच्यासारख्या भारत विरोधी गटाची कारस्थाने असल्याचंही अदानी समुहाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय.
दहावर्षांपूर्वीच डायरेक्टोरेट आऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) ने या सर्व आरोपांची चौकशी करताना, सर्व व्यवहार तपासले आहेत. अदानी समुहात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या गुंतवणुकीचा शोध घेण्यात आला होता. त्यातही त्यांना काही आक्षेपार्ह आढळलं नसल्याने हा सर्व तपास थांबवण्यात आल्याचं अदानी समुहाकडून जारी स्पष्टीकरणात म्हटलंय. डीआरआयनंतर निष्पक्ष प्राधिकरण आणि अपलेट ट्रिब्युनलनेही अशा आरोपांत तथ्य नसल्याचं सांगत, अदानी समुहाने कुठेही आपलं बाजारमूल्य कृत्रिमरित्या फुगवलेलं नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचं अदानीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय. अदानी समुहाचे सर्व देशी-विदेशी आर्थिक व्यवहार हे कायदेशीर असल्याचा निर्वाळाही सर्व शासकीय आणि बिगर शासकीय यंत्रणांनी दिल्याचा दावा अदानी समुहाच्या निवेदनात करण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपातून अदानी समुहाला क्लीनचिट दिल्याचा दावा अदानी उद्योगाकडून करण्यात आला आहे.
ओसीसीआरपी अहवालातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबाबत केलेल्या आरोपांची चौकशी सेबीमार्फत सुरु असल्याचा दावा अदानी समुहाने केला आहे. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीलाही या आरोपांमध्ये काही तथ्य तसंच आरोप सिद्ध करण्याएवढा पुरावा आढळला नसल्याचा पुनरुच्चार अदानी समुहाच्या निवेदनात करण्यात आला आहे.