
मत्स्य 6000 नावाच्या पाणबुडीचं बांधकाम देशात सुमारे 2 वर्षांपासून सुरू आहे. मत्स्य 6000 ची पहिली चाचणी 2024 मध्ये चेन्नईच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात घेतली जाईल.
भारताची बहुप्रतिक्षित चांद्रयान -3 (Chandrayaan – 3) मोहीम यशस्वी झाली. आता विक्रम लँडरसह प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये टाकण्यात आले आहे. त्यांनतंर काही दिवसांत इस्रोनं सुर्य मिशनही () यशस्वीरित्या लाँच केलं. सध्याच्या अपडेटनुसार, आदित्या एल -1 नं नुकतंच तीसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता इस्रोकडू त्यांच्या नव्या मोहीमेबद्दल माहिती देण्यात आली आहे. इस्रो (Isro) लवकरच मिशन समुद्रयान (Mission Samudrayaan) लाँच करणार आहे. या मिशन अंतर्गत स्वदेशी पाणबुडी (submersible) 6 हजार मीटर खाली खोल पाण्यात पाठवण्यात येणार आहे आणि समुद्राच्या पोटातील अनेक रहस्य उलगडले जाणार आहे.
काय आहे मिशन समुद्रयान
मिशन समुद्रयान मध्ये मत्स्य 6000 (Masya 6000) स्वदेशी पाणबुडीचा समावेश असून ही पाणबुडी तयार करण्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मिशनमध्ये तीन जण जाणार आहेत. मत्स्य 6000 ची पहिल्या चाचणी 2024 मध्ये चेन्नईच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात घेतली जाईल. टायटॅनिकच्या अवशेषाचा शोध घेण्यासाठी पर्यटकांना उत्तर अटलांटिक महासागरात नेत असताना जून 2023 मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर भारताने आपली स्वदेशी पाणबुडी तयार करताना अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
मत्स्य 6000 हे निकेल, कोबाल्ट, मॅंगनीज, हायड्रोथर्मल सल्फाइड आणि गॅस हायड्रेट्स सारख्या मौल्यवान खनिजांचे अन्वेषण करण्यासाठी पाठवले जाईल. हे खोल-समुद्रातील हायड्रोथर्मल व्हेंट्स आणि कमी-तापमान मिथेन सीप्समध्ये उपस्थित केमोसिंथेटिक जैवविविधतेची तपासणी करेल.
मत्स्य 6000 ची निर्मिती कोण करत आहे?
मत्स्य 6000 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) द्वारे विकसित केले जात आहे. या सबमर्सिबलचे डिझाईन, चाचणी प्रक्रिया, प्रमाणन, मानक ऑपरेटिंग प्रोटोकॉलचे पुनरावलोकन यासाठी NIOT शास्त्रज्ञ देखील काम करत आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, समुद्रयान मोहीम खोल समुद्रात शोधासाठी सुरू केली जात आहे. आम्ही 2024 च्या पहिल्या तिमाहीत 500 मीटर खोलीवर सागरी चाचण्या घेणार आहोत. हे मिशन 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनी मानवयुक्त पाणबुड्या विकसित केल्या आहेत.
एनआयओटीचे संचालक जीए रामदास म्हणाले की, मत्स्य 6000, तीन व्यक्तींसाठी 2.1 मीटर व्यासाचा गोल, डिझाइन आणि तयार करण्यात आला आहे. हा गोल 80 मिमी जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवला जात आहे ज्यामुळे 6,000 मीटर खोलीवर 600 बारचा (समुद्र सपाटीच्या दाबापेक्षा 600 पट जास्त) दाब सहन करावा लागतो. सबमर्सिबल 96-तास ऑक्सिजन पुरवठ्यासह 12 ते 16 तास सतत ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.