air india recruitment

टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोट्यातील एअर इंडिया 18 हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली.

नवी दिल्ली: टाटा समुहाने एअर इंडिया कंपनी जानेवारी 2022 मध्ये आपल्या ताब्यात घेतली. टाटा ग्रुपची एअरलाईन एअर इंडिया आपल्या सेवेचा विस्तार करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी विमान खरेदी आणि स्टाफ भरतीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बोइंग आणि एअरबसला 470 विमान खरेदीची ऑर्डर दिली होती. त्यापैकी दोन ‘777-200 एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत. यातील 70 विमानं ही मोठी आहेत. त्याशिवाय 36 विमाने भाड्याने घेतली जाणार आहेत.

एअर इंडियासंदर्भातील आणखी एक बातमी समोर आली आहे. एअर इंडिया यंदा 900 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. वैमानिकांसोबतच देखभाल अभियंत्यांचीही मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे.

एअर इंडियाच्या विस्तारासाठी भरती
टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोट्यातील एअर इंडिया 18 हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत एअर इंडियाने 1,900 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि 1,100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

15 आठवड्यांचे प्रशिक्षण
भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 15 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये यांचं ट्रेनिंग दिलं जाईल. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची गरज आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला 6500 हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.