“All is not well…” शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक उणे ४० डिग्रीत उपोषणाला बसणार; पंतप्रधान मोदींना म्हणाले…

सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर देखील आमची मागणी मान्य का झाली नाही. वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    लडाख: ‘थ्री इंडियटस’ हा हिंदी सिनेमा ज्यांच्या जीवनावर आधारित तयार केला होता, ते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. लेह आणि लडाखमधील (Leh and Ladakh) हिमनद्याच्या संरक्षणासाठी आताच संरक्षणात्मक पावले उचलली नाही तर येथील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. काश्मीरमधील (Kashmir) विद्यापीठ आणि अन्य संस्थांनी केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की, हिमनद्यांचे संरक्षण न केल्यास लेह-लडाखमधील दोनतृतियांश हिमनद्या नष्ट होतील. आता यासाठीच वांगचूक लडाख वाचवण्यासाठी आक्रमक झाले असून, यासाठी ते उपोषण करणार आहेत.

    दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी एक व्हिडिओ शेअर करत उपोषणाला बसण्याचा इशार दिला आहे. वांगचूक हे २६ जानेवारीपासून ५ दिवस उणे ४० अंश तापमानात उपोषणाला बसणार आहे. या उपोषणाला त्यांनी क्लायमेट फास्ट असे म्हटले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लडाखमधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच “All is not well…” असं म्हटलं आहे.

    लडाखमधील लोकांना हा प्रश्न पडला आहे की सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर देखील आमची मागणी मान्य का झाली नाही. वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उपोषणासंदर्भात पोस्ट करताना ते म्हणाले की, यातून जर मी वाचलो तर भेटू, असं व्हिडिओत म्हटलं आहे. लडाखचा भारतीय घटनेच्या सहाव्या परिष्ठात समावेश करावा अशी वांगचूक यांची मागणी आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आणि हिल काउंसिल निवडणुकीत भाजपने जाहिरनाम्यात या गोष्टीचा समावेश केला होता. तरी देखील आता भाजपने यावरून हातवर केले आहेत. यामुळं वांगचूक आक्रमक झाले असून, वांगचूक २६ जानेवारीपासून खार्दुंगला येथे उपोषणाला बसणार आहेत.