ट्रेनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळली महिला पोलिस अन् रात्रीतच भरवले गेले हायकोर्ट; जाणून घ्या नेमकं झालं काय?

उत्तर प्रदेशातील (UP Crime) अयोध्येत 30 ऑगस्टला सकाळी सरयू एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात आढळली. सीटखाली हवालदाराचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. तिच्या चेहऱ्यावर चाकूच्या खोल जखमा होत्या.

    प्रयागराज : उत्तर प्रदेशातील (UP Crime) अयोध्येत 30 ऑगस्टला सकाळी सरयू एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात आढळली. सीटखाली हवालदाराचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. तिच्या चेहऱ्यावर चाकूच्या खोल जखमा होत्या. महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) स्वतः या प्रकरणाची दखल घेतली.

    उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रीतिनकर दिवाकर यांनी रविवारी रात्री नऊ वाजता विशेष खंडपीठ स्थापन करून त्यांच्या शासकीय निवासस्थानी या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. या घटनेवर नाराजी व्यक्त करत खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारकडे उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रीतिनकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. खंडपीठाने सरकारी वकील ए. के. सँड यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील मागवला आणि त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

    चेहऱ्यावर चाकूचे घाव

    30 ऑगस्टला पहाटे 4 वाजता अयोध्या जीआरपीला ट्रेनमध्ये एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी अवस्थेत आढळली. जीआरपी ट्रेनमध्ये पोहोचले, तेव्हा लेडी कॉन्स्टेबलचा गणवेश अस्ताव्यस्त होता. चेहऱ्यावर व शरीरावर खोल जखमा होत्या. ती सीटखाली पडली होती. तिच्यावर कोणीतरी चाकूने हल्ला केला असावा, असा संशय आहे. चेहऱ्यावर 15 पेक्षा जास्त टाके पडले आहेत. जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर लखनौच्या केजीएमयूमध्ये उपचार सुरू आहेत.