पावसाळ्यात सारखे टायर पंक्चर होण्यानं वैतागलाय; मग ‘अशी’ घ्या काळजी

पावसाळ्यात वाहन चालवणं अनेकांना नकोसं वाटतं. चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत ड्राईव्ह करणं तसं अवघड काम असतं. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती खराब असते. मुंबईसारख्या शहरातले रस्ते तर पहिल्या पावसातच खड्डेमय होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रस्त्यांवरून ड्राईव्ह करताना गाडीचा स्पीड कमी ठेवा. पाणी साचलेले रस्ते किंवा चिखलमय रस्त्यांवरून वाहन घसण्याचा धोका असतो.

  नवी दिल्ली : पावसाळ्यात वाहन चालवणं अनेकांना नकोसं वाटतं. चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत ड्राईव्ह करणं तसं अवघड काम असतं. अनेक जण पावसाळा सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस पावसाची मज्जा घेतात, लाँग ड्राईव्हचा प्लॅन करतात. मात्र नंतर पावसात ड्राईव्ह करणं त्यांना नकोसं वाटतं. अनेक एक्सपर्ट ड्रायव्हर्सनादेखील पावसाळ्यात वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांवर पाणी तुंबलं असेल, खड्डे असतील, रस्त्यांवर चिखल झाला असेल तर ड्राईव्ह करणं अवघड असतं.

  दरम्यान अशातच वाहनाने साथ सोडली तर टायर पंक्चर झाला, गाडी बंद पडली, इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहनं बंद पडलं तर आणखीनच अडचण वाढते. अनेकदा वाहनं घसरतात, टायर्स पंक्चर होतात. पावसाळ्यात ड्राईव्ह करताना अडचणी खूप येत असल्या तरी काही गोष्टींची काळजी घेतली तर वाहन घसरून पंक्चर होण्यापासून वाचवता येईल.

  या गोष्टींची काळजी घ्या…

  पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती खराब असते. मुंबईसारख्या शहरातले रस्ते तर पहिल्या पावसातच खड्डेमय होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रस्त्यांवरून ड्राईव्ह करताना गाडीचा स्पीड कमी ठेवा. पाणी साचलेले रस्ते किंवा चिखलमय रस्त्यांवरून वाहन घसण्याचा धोका असतो. प्रामुख्याने ज्या रस्त्यांना लागून शेतजमीन असते ते रस्ते चिखलमय होतात. अशा रस्त्यांवरून ड्राईव्ह करताना अधिक काळजी घ्यायला हवी.

  तुम्ही तुमच्या वाहनाचा नेहमी वापर करत असाल तर गाडीचे टायर्स गुळगुळीत होतात. जर तुमच्या गाडीचे टायर्स गुळगुळीत झाले असतील तर ते आत्ताच बदलून घ्या. तसेच टायर्समध्ये 3mm थ्रेड्स असले पाहिजेत. कारण अशा टायर्सची रोडवर ग्रिप चांगली असते.

  तसेच टायर्समध्ये पुरेशी हवा (कंपनीने जितकी सांगितली आहे तितकी) असली पाहिजे. टायर्समध्ये हवा कमी असेल तर टायर पंक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. टायर्समध्ये हवा कमी असेल तर इंजिनवर प्रेशर येऊन कारचं मायलेज देखील कमी होतं.

  वाहनांचा वेग 80kmph पेक्षा जास्त नसावा

  पावसाळ्यात वाहन चालवताना त्याचा वेग मर्यादित असायला हवा. महामार्गावर तुमच्या वाहनांचा वेग 80kmph पेक्षा जास्त नसावा. तुम्ही जर कमी वेगाने वाहन चालवत असाल तर ते तुमच्या नियंत्रणात असतं. त्यामुळे वाहन घसरण्याचा आणि अपघाताचा धोका नसतो. ड्रायव्हिंग करताना अचानक एक्सलरेटर वाढवू नका. पटकन ब्रेक लावू नका. ब्रेक हळू हळू लावा जेणेकरून वाहन स्किड होणार नाही.