राजौरीत काल दहशतवादी हल्ल्या झालेल्या घराजवळ पुन्हा स्फोट; एका मुलाचा मृत्यू, ५ जखमी

हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरू असतान हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी (Rajouri Terrorist Attack) जिल्ह्यातील डांगरी गावात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आता पुन्हा राजौरीतून स्फोटाची बातमी समोर येत आहे. कालच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या घरी हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या हल्लात एका बालकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. घटनास्थळावरुन एक संशयित आयईडी आढळून आला आहे.

  काल राजौरी येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर दोन संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येत होती. त्यादरम्यान हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजौरी जिल्ह्यात आदल्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या या घटनेत जखमी झालेल्या इतर नऊ जणांवर उपचार सुरू असून राजौरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी सांगितले की, त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

  काल राजौरीत झाला दहशतवादी हल्ला

  काल सायंकाळी राजौरीतील डांगरी गावात दहशतवादी हल्ला झाला. दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी तीन घरांमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र भितीचं वातावरण असताना आज पुन्हा ब्लास्ट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर राजौरीत बंद

  राजौरी येथील एका विशिष्ट समुदायाच्या तीन घरांवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चार नागरिक ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सनातन धर्म सभा, राजौरी यांनी संपूर्ण बंद पुकारला आहे, याला विश्व हिंदू परिषद (VHP), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि वेओपार मंडळाने पाठिंबा दिला आहे.