अरुण गोयल देशाचे नवे निवडणूक आयुक्त, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण गोयल यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

    नवी दिल्ली – अरुण गोयल यांनी आज भारताचे नवे निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला. अरुण गोयल (Arun Goel) हे पंजाब केडरचे (Punjab Cadre) १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक पॅनेलमध्ये सामील होतील.

    गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election) तोंडावर निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण गोयल यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला होता. यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. सुशील चंद्र यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर १५ मे पासून तीन सदस्यीय आयोगातील एका निवडणूक आयुक्ताचे पद रिक्त होते. आज या पदावर अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदे मंत्रालयाने शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली.

    पंजाबमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी अरुण गोयल ३१ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यांनी ४० दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते मागील अनेक वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर काम करत होते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.