arvind kejriwal

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक विधान केलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल,असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

    दिल्ली: दिल्लीत एमसीडी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरु आहेत.(Delhi MCD Election) गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पार्टीचं (Aam Admi Party) मोठं आव्हान आहे. अशातच आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक विधान केलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल,असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

    अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. यांनी थोडंतरी काम केलं असतं, तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता.

    सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की,“एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, अर्धी भाजप तुरुंगात जाईल. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहेत. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, मात्र काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, १० कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग १० कोटी रुपये गेले कुठे?”

    ते पुढे म्हणाले की, “हेच खरे भ्रष्टाचारी आहेत. गुजरातमध्ये त्यांनी घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पूल बांधण्याचं कंत्राट दिलं. जगात कुठेही असं काही पाहिलेलं नाही. फक्त एका दिवसासाठी सीबीआय-ईडी आमच्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल.”

    मंत्री सत्येंद्र जैन यांच्या व्हिडीओवर केजरीवाल म्हणाले की, “ त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्या जेल मॅन्युअलनुसार आहेत. अमित शाह २०१० मध्ये तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यासाठी तिथे डिलक्स जेल बांधण्यात आलं होतं. कारागृहात त्यांचं जेवण बाहेरून यायचं. ते डिलक्स सुविधा घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकजण घेत असावा असं त्यांना वाटतं.”