ती कुत्र्यांना खायला देत होती, भरधाव थारने तरुणीला उडवलं; थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर!

चंडीगडमध्ये (Chandigarh) अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    चंडिगढ : हिट अँड रन, रस्ते अपघात, कार (Car Accident) अपघाताचं प्रमाण सध्या वाढत आहे. अशा अपघातांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. तसंच गंभीर जखमींचा आकडाही खूप असतो. चंडीगडमध्ये (Chandigarh) अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    तेजस्विताच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

    रात्रीच्या वेळी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना राँग साइडने वेगात आलेल्या थार गाडीने युवतीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर थार गाडी वेगात निघून गेली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अपघातप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र तेजस्विताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस लावले. आम्ही सीसीटीव्ही फूटेज दिल्यानंतरच तक्रार दाखल करण्यात आली, असे तेजस्विताचे कुटुंबीय म्हणाले आहेत.

    कारचालक न थांबता निघून गेला.

    तेजस्विताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मागील आठवड्यात शनिवारी रात्री घडली होती. तेजस्विता आपली आईसोबत रोज रात्री भटक्या कुत्र्यांना खायला देत असे. नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील तेजस्विता आपल्या आईसोबत कुत्र्यांना खायला देत होती. मात्र यावेळी मागून भरधाव वेगात एक कार आली. या कारने तेजस्विताला धडक दिली. तसेच अपघातानंतर न थांबता हा कारचालक थेट निघून गेला.

    तेजस्विता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती

    अपघाताच्या घटनेनंतर तेजस्विता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेजस्विताच्या आईने तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तेजस्विताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेजस्वितावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे.