तामिळनाडूसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून डॉ. नितीन राऊत यांची नियुक्ती; महाराष्ट्रातून फक्त एकालाच मिळाली आहे संधी

या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केवळ डॉ. नितीन राऊत यांचाच समावेश काँग्रेस पक्षाने केला आहे.

    नागपूर : पुढील महिन्यात तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांची स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे.

    येत्या ६ एप्रिलला एकाच टप्प्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवनकुमार बंसल यांनी काँग्रेसच्या ३० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केवळ डॉ. नितीन राऊत यांचाच समावेश काँग्रेस पक्षाने केला आहे.

    कार्यकर्त्यांकडून स्वागत

    डॉ. राऊत यांच्या नियुक्तीचे नागपूर शहर तथा ग्रामीण काँग्रेस समितीच्या अनेक पदाधिकारी-सदस्यांनी स्वागत केले आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपूरकर, काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे, राजाभाऊ करवाडे, सुरेश पाटील यांनी विशेष स्वागत केले आहे.