‘करवा चौथ’ करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला थेट घटस्फोटच मागितला; जाणून घ्या नेमकं घडलं काय?

दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाबाबत नुकताच एक निर्णय दिला आहे. पत्नीने करवा चौथचा (Karwa Chauth) उपवास करण्यास नकार दिला होता. तसेच पतीचाही अस्वीकार केला. दिल्ली उच्च न्यायालयाने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे.

    नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाबाबत नुकताच एक निर्णय दिला आहे. पत्नीने करवा चौथचा (Karwa Chauth) उपवास करण्यास नकार दिला होता. तसेच पतीचाही अस्वीकार केला. दिल्ली उच्च न्यायालयाने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. पत्नीने आपल्या पतीला वैवाहिक जीवनात सतत नकार देणे आणि अस्वीकार करणे हे प्रचंड मानसिक त्रासाचे कारण आहे, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

    न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. दोघांनी मार्च 2011 मध्ये लग्न केले आणि सहा महिन्यांनंतर ते वेगळे राहू लागले. न्यायालयाने सांगितले की, पतीने आपल्या साक्षीत म्हटले आहे की, पत्नीने ‘करवा चौथ’चा उपवास करण्यास नकार दिला होता. कारण ती दुसऱ्या पुरुषाला आपला पती मानते. तिच्या आई-वडिलांचा विरोध असल्यामुळे त्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न लावले.

    कोर्टाने म्हटले आहे की, असे कोणतेही नाते वेगळे करणे आणि प्रतिवादीला पती म्हणून सतत नकार देणे किंवा न स्वीकारणे हे पतीसाठी मोठ्या मानसिक त्रासाचे कारण आहे. पत्नीचे अपील फेटाळताना खंडपीठाने सांगितले की, कौटुंबिक न्यायालयाने असे मानले आहे की पत्नीच्या वागणुकीमुळे पतीला अत्यंत मानसिक त्रास, वेदना आणि क्रूरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे तो घटस्फोट घेण्यास पात्र आहे.