23 ऑगस्ट ‘नॅशनल स्पेस डे’ साजरा होणार, विक्रम लँडर उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव; चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचलं त्याला ‘तिरंगा’ नावाने ओळखणार, पंतप्रधानांकडून घोषणा

आता येथून पुढे 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून जाहीर केला  जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस 'नॅशनल स्पेस डे' म्हणून जाहीर केला जाईल.

  बंगळुरू – भारताने २३ ऑगस्टला (बुधवारी) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान ३ (chandrayan 3) हे भारताचे यान यशस्वीरित्या चंद्रावर पोहचले आहे. यामुळं सर्व जगाने भारताचे कौतुक केले आहे. दरम्यान, आज परेदश दौऱ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारतात परत येताच, बंगळुरात नागरिकांशी संवाद साधला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या कार्यालयात जात शास्त्रज्ञांची भेट घेत, त्यांचे अभिनंदन केले. तसेच या मोहीमेबद्दल जाणून घेतले. यावेळी त्यांनी बंगळुरात इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांशी संवाद साधला. मोदी यांनी प्रत्येक शास्त्रज्ञांचं अभिनंदन करतानाच त्यांच्याशी चर्चाही केली. इस्रो सेंटरमधील विक्रम लँडरच्या प्रतिकृतीही त्यांनी पाहिल्या आणि त्याचीही माहिती घेतली. त्यांना इस्रोकडून विक्रम लँडरची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. यावेळी त्यांनी संबोधित करताना मोदी भावूक झाले. (august twenty three national space day will be celebrated the place where vikram lander landed will be named shiva shakti announced by the pm)

  23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’

  दरम्यान, आता येथून पुढे 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून जाहीर केला  जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल. त्या दिवशी देशभर जल्लोष करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा दिवस म्हणजे भारतीयांसाठी मोठा गौरवशाली दिवस आहे, देश हा दिवस विसरु शकत नाही. प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे, असं मोदी म्हणाले.

  विक्रम लँडर उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

  पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरले त्या जागेला आजपासून ‘शिवशक्ती’ ह्या नावाने ओळखले जाईल. तसेच हे अनेकांना प्रेरणा देईल. असं मोदी म्हणाले. चंद्राचा शिवशक्ती पॉइंट भारताच्या या संशोधकांच्या प्रयत्नांचा साक्षीदार होईल. हा शिवशक्ती पॉइंट येणाऱ्या पिढींना प्रेरणा देणार. आपल्याला विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करायचा आहे. मानवतेचं कल्याण हीच आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. चंद्रयान मोहीमेत महिला वैज्ञानिकांनी मोठी भूमिका बजावली आहे. या मोहीमेत नारी शक्ती दिसून आली.

  चंद्रयान-2 चंद्रावर पोहचले त्या जागेला ‘तिरंगा’ या नावाने संबोधणार

  सध्या हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी मोठा अभिमानाचा आहे. प्रत्येकाला तुमच्याबद्दल आदर आहे. जे कोणी केलं नव्हतं ते भारतानं केलं. जेव्हा हर घर तिरंगा आहे. प्रत्येक मन तिरंगा आहे. चंद्रावरही तिरंगा आहे. त्यामुळे चंद्रयान-2 शी संबंधित जागेला तिरंगा नावाशिवाय दुसरं काय नाव राहू शकतं? चंद्रयान-2ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक…

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांशी संवाद साधताना भावूक झाले. गहिवरले त्यांचा गळा दाटून आला. आजचं जे यश आहे ते निव्वळ आपल्या शास्त्रज्ञांचं यश आहे, तुमच्या परिश्रमाला, मेहनतीला माझा सलाम. त्याग आणि समर्पण यामुळं तुम्हाला हे यश मिळाल आहे. असं मोदी म्हणाले.