ऑस्ट्रेलियन मीडियाने केले भारताचे कौतुक, ‘अनस्टॉपेबल’ म्हणून केला उल्लेख

ऑस्ट्रेलियन खासदार लिसा सिंग यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये लिहिले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या १० वर्षांपासून व्यापार कराराची तयारी सुरू होती. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील व्यापारी संबंध कमकुवत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कधीही न संपणाऱ्या भारतासोबत करार केला आहे.

    नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियन संसदेने भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराला (FTA) मंजुरी दिली आहे. त्यावर लवकरच स्वाक्षरी होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन मीडियाने भारताचे कौतुक केले आहे. एका ऑस्ट्रेलियन मीडिया हाऊसने भारताला न थांबवता येणारा देश, असे वर्णन केले आहे. संसदेत एफटीए मंजूर झाल्यानंतर, सिडनी मॉर्निंग हेराल्डने लिहिले की, ऑस्ट्रेलियाने ‘अनस्टॉपेबल इंडिया’सोबत मुक्त व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्त व्यापार करारानंतर मोठ्या प्रमाणात करसवलत मिळणार आहे.

    ऑस्ट्रेलियन खासदार लिसा सिंग यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये लिहिले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या १० वर्षांपासून व्यापार कराराची तयारी सुरू होती. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील व्यापारी संबंध कमकुवत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कधीही न संपणाऱ्या भारतासोबत करार केला आहे.

    ऑस्ट्रेलिया व्यापाराच्या बाबतीत चीनवर सर्वाधिक अवलंबून आहे. परंतु २०२१ मध्ये चीनने ऑस्ट्रेलियाशी सर्व व्यापार करारांवर बंदी घातली. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जवळीक वाढली. गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील व्यापार $२७.५ अब्ज होता. चीनच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. परंतु मुक्त व्यापार कराराला (FTA) मंजुरी मिळाल्यानंतर भारतासोबत व्यापार करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.