अयोध्येतल्या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, मोडला स्वतःचाच विक्रम!

नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी, अयोध्येच्या 51 घाटांवर एकाच वेळी सुमारे 22.23 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले.

    देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या औचित्यावर शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसिद्ध दीपोत्सव कार्यक्रमात रामभक्तांनी लाखो दिवे लावून विश्वविक्रम केला. शरयू नदीच्या काठावरील 51 घाटांवर तब्बल 22.23 लाख मातीचे दिवे लावण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिवे प्रज्वलित केल्याबद्दल या दीपोत्सवाची  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तसेच, यापुर्वीचा त्यांनी स्वतःचा विक्रम मोडत नवा विक्रम केला आहे.

    अयोध्येत जागतिक विक्रम

    नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी, अयोध्येच्या 51 घाटांवर एकाच वेळी सुमारे 22.23 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. अयोध्येच्या या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रामनगरीने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेनंतर अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या वर्षी सुमारे 51,000 दिवे प्रज्वलित झाले. 2019 मध्ये ही संख्या 4.10 लाख झाली. 2020 मध्ये 6 लाखांपेक्षा जास्त आणि 2021 मध्ये 9 लाखांहून अधिक मातीचे दिवे लावले गेले. 2022 मध्ये राम की पायडीच्या घाटांवर 17 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. तथापि, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केवळ पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ प्रज्वलित राहिलेल्या दिव्यांचा विचार केला आणि 15.76 लाखांचा विक्रम नोंदवला गेला.

    विविध कार्यक्रमाचं आयोजन

    दीपोत्सव कार्यक्रमात रामायण, रामचरितमानस आणि विविध सामाजिक समस्यांवर आधारित अठरा झलक सादर करण्यात आल्या. उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवला. उदय चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ती राम कथा उद्यानात पोहोचली. मुलांचे हक्क आणि मूलभूत शिक्षण, महिला सुरक्षा आणि कल्याण, स्वावलंबन, जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवर हे टॅलेक्स आधारित होते.