ayodhya ram mandir dhanushya and stone

श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. नेपाळमधील कालिगंडकी नदीतून ३५० ते ४०० टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा ३१ जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत.

    अयोध्येमध्ये (Ayodhya) तयार होत असलेल्या राम मंदिरामध्ये (Ram Temple) रामललांची बाल स्वरुपातील मूर्ती ज्या शिळेपासून बनवण्यात येणार आहे तो सर्वसाधारण दगड नसून त्याला ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. नेपाळच्या (Nepal) म्यागदी जिल्ह्यातील बेनी येथून विधीवत या शाळिग्राम शिळेला अयोध्येला आणले जाणार आहे.

    म्याग्दीमध्ये आधी क्षमापूजा करण्यात आली. त्यानंतर भौगोलिक आणि पुरातत्व विषयातील तज्ञांच्या देखरेखीखाली दगड खणून काढण्यात आला. आता त्याला एका ट्रकमध्ये ठेऊन संपूर्ण राजकीय सन्मानासह अयोध्येला नेलं जात आहे. ज्या ज्या रस्त्यारून ही शाळिग्राम शिळा नेली जाणार आहे तिथे तिथे लोक या शिळेच्या दर्शनासाठी आणि पूजनासाठी गोळा होत आहेत.
    साधारण सात महिन्यांपूर्वी नेपाळचे माजी उपपंतप्रधान तसेच गृहमंत्री विमलेंद्र निधी यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टसमोर प्रस्ताव ठेवला तेव्हापासून या सगळ्या तयारीला सुरुवात झाली होती. अयोध्येत जर भव्य राम मंदिर तयार होत असेल तर श्रीरामाचं सासर असलेल्या नेपाळमधील जनकपूरमधून काहीतरी योगदान स्वीकारलं गेलं पाहिजे.

    लेकीच्या सासरी जेव्हा काही कार्य असते तेव्हा माहेरातून आहेर दिला जातो. त्याच परंपरेनुसार हे करू देण्याची विनंती नेपाळ सरकारकडून करण्यात आली.भारत सरकार आणि राम मंदिर ट्रस्टकडून होकार मिळाल्यावर हिंदू स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद नेपाळ यांच्यासह समन्वय साधून हे ठरवण्यात आलं की जर मंदिर दोन हजार वर्ष टिकेल असं बनवलं जात आहे तर त्यातली मूर्तीसुद्धा अशीच आध्यात्मिक, धार्मिक आणि पौराणिक महत्व असलेल्या शिळेपासून बनवली गेली पाहिजे. त्यानुसार जनकपूरहून शाळिग्राम शिळा अयोध्याला पाठवली जात आहे.भगवान विष्णूचे रुप म्हणून शाळिग्राम दगडाची पूजा केली जाते. त्यामुळे याला देवशिळाही म्हटले जाते.

    शाळिग्राम शिळा आहे खास
    श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळमधील कालिगंडकी नदीतल्या दोन मोठ्या शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. नेपाळमधील कालिगंडकी नदीतून ३५० ते ४०० टन वजनाचा मोठ्या शाळिग्राम शिळा ३१ जानेवारी रोजी अयोध्येत पाठवल्या जाणार आहेत. जनकपूर येथे ३० जानेवारी रोजी या शिळांची चाचणी होणार आहे. त्यानंतर रस्त्याने हे दगड अयोध्येला रवाना होतील.या शिळा साडे सहा कोटी जुन्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    धनुष्य
    तसेच नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिराशी संबंधित लोकांनी श्रीरामासाठी धनुष्य बनवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात ३० जुलै रोजी नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विमलेंद्र निधी आणि जानकी मंदिर जनकपूरचे महंत रामतापेश्वर दास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ नेपाळी जनतेच्या वतीने अयोध्येत जाऊन चंपत राय, स्वामी गोविंददेव गिरी आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांना भेटले होते. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांच्या वतीने जानकी माता मंदिराला कालिगंडकी नदीतील शिळा आणि श्री रामाचे धनुष्य देण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे.