
गुजरात, दापोली, रत्नागिरी, अलिबाग, वसई, पालघर, हर्णे, श्रीवर्धन अशा विविध भागांतील या नौका असून, दालदी आणि फास्ट फिशिंगसाठी या नौका खोल अरबी समुद्रात गेल्या होत्या.
अलिबाग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वायव्य दिशेने वेगाने कूच करीत असून, त्यामुळे येत्या २४ तासात अरबी समुद्रात वादळी पावसासह वाऱ्यांची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीस जाऊ नये, असे हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या नौका तातडीने सुरक्षित आसरा म्हणून शुक्रवारपासून आगरदांडा-दिघी बंदरात सायंकाळी दाखल झाल्या आहेत. नौकांची संख्या ७०० ते ८०० आहे, अशी माहिती राजपुरी येथील मच्छिमार चिंतामणी बाणकोटकर यांनी दिली.
ते म्हणाले की गुजरात, दापोली, रत्नागिरी, अलिबाग, वसई, पालघर, हर्णे, श्रीवर्धन अशा विविध भागांतील या नौका असून, दालदी आणि फास्ट फिशिंगसाठी या नौका खोल अरबी समुद्रात गेल्या होत्या. सध्या समुद्रात वादळी वारे जोरकसपणे वाहत असून, कोणतीही दुर्घटना होऊ शकते. विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, अरबी समुद्रात वादळी वाऱ्याचा वेग ६५ ते ७० प्रतितास असू शकतो. वादळात आगरदांडा-दिघी बंदर आसऱ्यासाठी सुरक्षित मानले जाते. सायंकाळी उशिरादेखील आगरदांडा बंदराकडे येणाऱ्या नौकांची संख्या वाढती आहे. दोन दिवसांपासून मोठी मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.