
भगवंत मान यांचं सरकार स्थापन झाल्यापासून 10 महिन्यांत एकूण 26074 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वत: भगवंत मान यांनी तसा दावा केला आहे.
पंजाब: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सरकारची स्थापना होऊन आता 10 महिने झाले आहेत. भगवंत मान यांचं सरकार स्थापन झाल्यापासून 10 महिन्यांत एकूण 26074 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वत: भगवंत मान यांनी तसा दावा केला आहे. त्यांनी 188 जणांना कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र दिले असल्याचेही ते म्हणाले. या नियुक्ती पत्राच्या समारंभावेळी ते बोलत होते. हे ऐकल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंजाब सरकारच्या मोठ्या प्रमाणावर नोकरी देण्याच्या धडाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
भगवंत मान म्हणाले की,“राज्य एक नवी क्रांती अनुभवत आहे. येथे तरुणांना सरकारी नोकरी देऊन सशक्त केले जात आहे. मागील 10 महिन्यांपासून योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सरकारकडून 26074 जणांना नोकरी देण्यात आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात तरुण-तरुणींना आणखी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.”
तेप पुढे म्हणाले, “निवडणुकीत इतर पक्षांनी मतदारांना पक्त आश्वासन दिले होते. मात्र आम्ही मतदारांना हमी दिली होती. आम्ही हळूहळू दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू.”
आम आदमी क्लिनिक
“राज्य सरकारने प्रति महिना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे,” असेही भगवंत मान म्हणाले. याशिवाय पंजाब सरकारने नुकतेच 500 आम आदमी क्लिनिक सुरू केले आहेत. याबाबत ते म्हणाले की, “या आम आदमी क्लिनिकमध्ये आम्ही रुग्णांची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने साठवून ठेवतो. यामुळे प्राणघातक आजारांविरोधात लढण्यास मदत होते.”