जम्मूमध्ये कडेकोट बंदोबस्तात भारत जोडो यात्रा सुरू, स्फोटानंतर अलर्ट जारी, NIA तपासासाठी दाखल

जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी, कार्याध्यक्ष रमण भल्ला आणि हजारो कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा हाती घेऊन राहुल गांधींनी सकाळी 8 वाजता लोंडी चेक पॉईंट पार केले. ही यात्रा सांबा जिल्ह्यातील तपयाल-गगवालमध्ये दाखल झाली आहे.

    नवी दिल्ली – जम्मूतील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथून आज रविवारी दुपारी कडक बंदोबस्तात भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली. शनिवारच्या विश्रांतीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 7 वाजता हिरानगरातून यात्रेला प्रारंभ झाला. नरवाल येथे शनिवारी झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला. NIAचे पथक तपासासाठी पोहोचले आहे. दुसरीकडे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देखील उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

    जम्मू-पठाणकोट महामार्ग वाहतूकीसाठी बंद
    जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी, कार्याध्यक्ष रमण भल्ला आणि हजारो कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा हाती घेऊन राहुल गांधींनी सकाळी 8 वाजता लोंडी चेक पॉईंट पार केले. ही यात्रा सांबा जिल्ह्यातील तपयाल-गगवालमध्ये दाखल झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-पठाणकोट महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

    राहुल गांधींचे जंगी स्वागत
    यात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी राहुल गांधींचे जंगी स्वागत केले. प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षा यंत्रणा जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही पालन करू.