
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अनेक आमदार व खासदारांनी साथ सोडल्यानंतर जे सोबत आहेत त्यातील एका खासदाराचे लोकसभेतून निलंबन झाले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अनेक आमदार व खासदारांनी साथ सोडल्यानंतर जे सोबत आहेत त्यातील एका खासदाराचे लोकसभेतून निलंबन झाले आहे. लक्ष्यदीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेत अपात्र ठरवण्यात आलं आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या खासदारावर खुनाचा आरोप आहे. केरळ उच्च न्यायालाने त्यांच्यावरील शिक्षा कायम ठेवली आहे. त्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून फैजल यांची खासदारकी रद्द केल्याचं मानलं जाणार आहे. त्याच दिवशी उच्च न्यायालयाने फैजल यांना शिक्षा सुनावली होती.
लोकसभा सचिवालयाचं बुलेटिन
लोकसभा सचिवालयाने एक बुलेटिन जारी केलं आहे. त्यात त्यांनी हा निर्णय स्पष्ट केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला आदेश पाहता लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पीपी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे. 11 जानेवारी 2023 रोजी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. त्या दिवसापासूनच फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात येत आहे, असं या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय आहेत आरोप?
फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षाच्या कठोर कारवासाची शिक्षा सुनावली होती. कावारत्ती सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फैजल यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने फैजल यांना दोषी ठरवलं आहे.